मुंबई: आपल्या रोखठोक आणि परखड बोलण्याच्या शैलीसाठी प्रसिद्ध असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियावर नुकताच एक व्हीडिओत प्रसिद्ध केला आहे. या व्हीडिओत अजित पवार (Ajit Pawar) हे राज्यातील जनतेला भावनिक साद घालताना दिसत आहेत. बाकीचे नेते राजकारण करतात, पण हा अजितदादा काम करतो, असे सांगत अजित पवार यांनी विरोधकांना फटकारले आहे. तसेच आपण अर्थमंत्री म्हणून मांडलेल्या अर्थसंकल्पाचा सामान्य जनतेला कसा फायदा होणार आहे, हे अजित पवार यांनी जनतेला पटवण्याचा प्रयत्न या व्हीडिओच्या माध्यमातून केला आहे. 


एरवी अजित पवार यांचं नाव निघालं की, डोळ्यासमोर उभी राहते ते मीडियापासून अंतर राखून असणाऱ्या आणि बोलण्यापेक्षा कृतीत जास्त रस असणाऱ्या नेत्याची प्रतिमा. त्यामुळे अजित पवार जाहीर सभांमधील भाषणं सोडली तर सोशल मीडियावर प्रसारमाध्यमांशी फारसा संवाद साधताना दिसत नाहीत. इतकंच काय अजित पवार हे प्रसारमाध्यमांशी बोलताना मोजकंच बोलतात. एखाद्या आरोपावर किंवा टीकेवर उत्तर देण्यासाठी प्रसारमाध्यमांशी बोलणे वेगळे. पण एरवी अजित पवार हे स्वत:हून आपल्या निर्णयांची किंवा कामांची जाहिरात करताना फारसे दिसत नाहीत. त्यामुळे अजित पवार यांनी गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या व्हीडिओमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.


एरवी अजित पवार स्पेशल कॅमेरा सेटअप लावून व्हीडिओ करण्याच्या फारसे फंदात पडत नाहीत. त्यामुळे अजित पवार यांचा आजचा व्हीडिओ अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. अजित पवार यांनी व्हीडिओच्या माध्यमातून अर्थसंकल्पातील घोषणा आणि निर्णयांमध्ये आपली कशी महत्त्वाची भूमिका आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. समोरच्या टेलिम्प्रॉप्टर लिहलेल्या गोष्टी वाचून आपल्याच निर्णयांची जाहिरात करण्याचा प्रकार अजित पवार एरवी करत नाहीत. मात्र, आजच्या व्हीडिओद्वारे अजित पवार यांनी त्यांच्या आजवरच्या या प्रतिमेला छेद दिला आहे.


या व्हीडिओत अजित पवार जनतेला भावनिक साद घालताना दिसत आहेत. विरोधकांनी राजकारण करावे, पण तुमचा दादा तुमच्यासाठी काम करत राहील, असे अजित पवार सांगताना दिसत आहे. राज्याचा अर्थसंकल्प हा अजित पवार यांनी मांडला असला तरी सगळ्यात जास्त चर्चा ही 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ची आहे. त्यामुळे कुठेतरी याचा फायदा एकनाथ शिंदे यांनाच जास्त मिळू शकतो. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आजच्या व्हीडिओतून आपण मांडलेला अर्थसंकल्प कशाप्रकारे सर्वसमावेशक आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 


अजित पवार नेमकं काय म्हणाले?


माझ्या महाराष्ट्रवासीयांनो मी काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर केलेला आहे तो तुम्ही सर्वांनी पाहिला असेलच. राज्याच्या अशा प्रकारच्या ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करण्याचा भाग्य मला लाभले याचा मला सार्थ अभिमान आहे. या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 60 वयोगटातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात तर मला दीड हजार रुपये जमा केले जाणार आहेत. या योजनेवर राज्य सरकार प्रतिवर्षी 46 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. आजवर आपण पाहत आलोय की प्रत्येक कुटुंबातील आई स्वतःवरील खर्च शक्य तितकी काटकसर करते, पण आपल्या मुलाबाळांना काही कमी पडणार नाही, याची काळजी ती घेते. परंतु काही वेळा परिस्थितीशी अशी निर्माण होते की आर्थिक अडचणीमुळे घरातील मुलांच्याकडं जास्त लक्ष दिलं जातं आणि नेमकं मुलींकडे दुर्लक्ष होतं. मात्र, आता मला आशा आहे की माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या अर्थसाहयाच्यामुळे राज्यातील माता-भगिनींची ही विवंचना दूर होईल.


राज्यातील प्रत्येक महिला आर्थिक सामाजिक दृष्ट्या सक्षम व्हावी, स्वतःच्या पायावरती उभे राहावी. कुठल्याही महिलेला असं वाटू नये की, आपण दैनंदिन गरजांसाठी वडील भाऊ किंवा नवऱ्यावर अवलंबून आहोत. त्यामुळेच ज्यावेळी माझी लाडकी बहीण योजनेचा विचार करतो तेव्हा मलाही योजना म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने टाकण्यात आलेलं अत्यंत क्रांतिकारी पाऊल वाटतं. आमच्या सरकारने आपल्या अनुभवाच्या जोरावर हे अशक्य वाटणारे काम शक्य करून दाखवलेले आहे. एवढेच नाही तर राज्यातील माता-भगिनींनी पुरुषांच्या तुलनेत कुठेही मागे राहणार नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी इतर अनेक पावलं उचलण्यात आलेली आहेत. 




विरोधक राजकारण करतील पण तुमचा दादा काम करेल: अजित पवार


निगेटिव्ह लोक या अर्थसंकल्पावर अकारण टीका करत आहेत त्यांच्याकडून अर्थसंकल्प वाईट असल्याचे सांगितलं जातंय. काहींकडून तर या बजेटला 'लबाडाच्या घरचं आवताण' आणि अजूनही बरीच नाव ठेवून हिणवलं जातंय. मला फक्त इतकच सांगायचंय की, या लोकांच्यामध्ये आणि तुमच्या अजितदादांमध्ये हाच फरक आहे की ते राजकारण करणार आहेत आणि तुमचा दादा काम करणार आहे. 


अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही पार्टी बदलली नाही अगदी पहिल्या दिवसापासून राज्याची जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे मी पूर्वी जनतेचाच होतो आजही जनतेचाच आहे मी जे काही करतो त्यामध्ये जनतेच्या हिताचाच विचार करतो राज्याच्या राज्यातील जनतेच्या विकासाच्या चाकाला अधिक गती कशी देता येईल याचाच विचार माझ्या डोक्यात कायम सुरू असतो राज्यातील जनतेच्या सर्वांगीण विकासाचा उद्दिष्ट समोर ठेवून त्याच विचारातून हा अर्थसंकल्प बनवण्यात आलेला आहे त्यामुळे जे लोक बजेटच्या नावाने नाक मुरडत आहेत. त्यांचे चेहरे आजच नीट बघून घ्या आणि नेहमीसाठी लक्षात ठेवा ही तीच लोक आहेत ज्यांना विकासाची गंगा तुमच्या घरादारापर्यंत येऊ द्यायची नाही. हीच ती लोक आहेत ज्यांना सरकारी योजनांच्या लाभांपासून तुम्हाला दूर ठेवायचं आहे मी अर्थसंकल्पात राज्यातील गोरगरीब कुटुंबांना वर्षभरात तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे त्या बदल्यात मला शिव्या शाप मिळत आहेत माझा दोष फक्त इतकाच की मी शेतकऱ्यांची दुःख आणि वेदना समजून घेतल्या, असे अजित पवार यांनी व्हिडीओत म्हटले आहे.


आणखी वाचा


पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का; 18 नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार!