Marathwada Dam Water: राज्यात मराठवाड्याच्या पाणीसाठ्यावरून कायम चिंता व्यक्त करत असताना मराठवाड्यातील हजारो गावांची तहान भागवणारे जायकवाडी धरण गणेशपुजनाला १०० टक्के भरलं आहे. त्यामुळं मराठवाड्याची तहान आता भागणार आहे. मराठवाड्यातील बहुतांश धरणं आता भरत आली असली तरी राज्याच्या तुलनेत ६५.३५ टक्के धरणं भरली आहेत. 


जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी जायकवाडी धरणात ३२.६९ टक्के पाणीसाठा होता. आता धरण १०० टक्क्यांनी भरलं आहे.


माजलगाव, मांजरा धरणात किती पाणीसाठा?


बीड जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसानं जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीची नोंद झाली होती. आता माजलगाव धरणात २८ टक्के आणि मांजरा धरणात  ७१.६६ टक्के पाणीसाठा आहे. काही दिवसांपूर्वी शुन्यावर असणारं माजलगाव धरण एका दिवसाच्या पावसात थेट १८ टक्क्यांवर गेलं होतं.


हिंगोलीचं सिद्धेश्वर धरणही फुल्ल


हिंगोली सिद्धेश्वर धरणही फुल्ल झालं असून मागच्या वर्षी ४५.९३ टक्के पाणी भरलं होतं. येलदरी धरण ६५ टक्के भरलं असून हिंगोलीत पूर आल्यानंतर आता हिंगोलीतील दोन्ही धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ होत आहे.


विष्णूपुरी ९१.४७ टक्के नांदेडकरांची तहान भागणार


नांदेडचे विष्णूपुरी धरण ९१.४७ टक्के आणि निम्न मनार  धरण १०० टक्के भरलं आहे. त्यामुळं नांदेडकरांना आता दिलासा मिळाला आहे.


धाराशिव, लातूरची धरणंही भरली.


धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील बहुतांश धरणं भरलं असून निम्न तेरणा ६७ टक्के तर लातूरच्याही धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ झाल्याचं जलसंपदा विभागानं नोंदवलं आहे. परभणीच्या निम्न दुधना धरण ७४.६७ टक्के पाणी शिल्लक झालंय.


मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता


मागील आठवड‌यात झालेल्या पावसानं मराठवाड्यात नागरिकांची दाणादाण उडाली होती. हजारो हेक्टरवरील शेती पाण्यााखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आता हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी मराठवाड्याला पावसाचा इशारा देण्यात आला असून त्यानंतर हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे.


गणेशोत्सवाला जोरदार पावसाचा अंदाज


मराठवा‌डयात गणेशाचं स्वागत पावसानं होणार आहे. हवामान विभागानं मराठवाड्यात जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. आज छत्रपती संभाजीनगरसह लातूर धाराशिव जिल्हे वगळता उर्वरित मराठवाड‌याला जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागूनच ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर ओडिशा, दक्षिण पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्याकडे येताना ही प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.