अहमदनगर : मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याशी निगडित कारखाने आणि कंपन्यांची चौकशी सुरु आहे. यावरून रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. राजकीय दृष्टिकोन ठेवून कोणी काही कारवाई केल्या तर इतरांनी देखील आपण काचेच्या घरात राहतो हे विसरू नये, असे त्यांनी म्हटले आहे. 


येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून माझ्यावर कारवाई होऊ शकते, अशी शंका रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. मात्र आम्ही ज्या कंपन्या उभ्या केल्या त्या कष्टाने आणि तिथे काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीतून उभा केल्या आहेत. राजकीय दृष्टिकोन ठेवून कोणी काही कारवाई केल्या तर इतरांनी देखील आपण काचेच्या घरात राहतो हे विसरू नये. त्यांनी ज्या कंपन्या उभ्या केलेला आहेत. त्याबाबत मी आता बोलणार नाही. मात्र, त्याचे पुस्तक माझ्याकडे तयार असल्याचा इशारा रोहित पवारांनी सत्ताधारी नेत्यांना दिला आहे. 


सुप्रिया सुळे यांनी 'ते' वक्तव्य उघडपणे केलेले नाही


शिंदें से बैर नहीं फडणवीस तेरी खैर नहीं", असं वक्तव्य सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केले असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र, याबाबत रोहित पवारांना विचारले असता सुप्रिया सुळे यांनी असं वक्तव्य उघडपणे केलेले नाही. कुठेतरी चर्चा झाली आणि त्यावरून या बातम्या झाल्या आहेत. त्यामुळे ज्या गोष्टी झालेल्या असतील त्यावर चर्चा करून वेळ का वाया घालावा? असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.


रोहित पवारांचं धर्मरावबाबा आत्रामांवर टीकास्त्र


मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या कथित संभाव्य बंडावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान घर फोडण्याचे काम काहीजण करत आहेत. घरात फूट पडणे समाजाला आवडत नाही. मी चूक केली तुम्ही करू नका, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आलापल्ली येथे म्हटले होते. याबाबत रोहित पवार यांना विचारले असता, त्यांनी धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. जो व्यक्ती आपल्या पोटच्या मुलीबाबत पाण्यात बुडवण्याची भाषा करतो. त्यावरून त्यांची विचारधारा काय आहे हे समोर येतं, असं म्हणत भाग्यश्री आत्राम यांनीच पवार साहेबांसोबत येण्यासाठी पुढाकार घेतल्याचं समजत आहे. मात्र सर्वस्वी निर्णय हा शरद पवार यांचा आहे. आम्ही कुणाचंही घर फोडलेलं नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.


रोहित पवारांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेला सुरुवात


दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज अष्टविनायकापैकी एक असलेल्या सिद्धटेक गणेश मंदिरात पूजा करून स्वाभिमान जनसंवाद यात्रेला सुरुवात केली. या स्वाभिमान यात्रेच्या माध्यमातून कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन ग्रामदैवत मंदिरात स्वच्छता केली जाणार आहे. तसेच संतांचे विचार हे तिथल्या नागरिकांच्या मनात रुजवले जाणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली आहे. राज्यात सध्या महापुरुषांचा अवमान केला जातोय, या गोष्टीचा विरोध करण्यासाठी यात्रा काढली गेल्याचंही पवार यांनी सांगितले.


आणखी वाचा


Chandrakant Patil: 'लाडका गुन्हेगार योजना...', चंद्रकांत पाटलांनी गजा मारणेकडून सत्कार स्वीकारल्यानंतर रोहित पवारांची सडकून टीका