औरंगाबाद : राज्यमंत्री मंडळाची 16 सप्टेंबर रोजी औरंगाबादमध्ये बैठक होत आहे. त्यामुळे यानिमित्ताने संपूर्ण मंत्रिमंडळ औरंगाबाद शहरात असणार आहे. सोबतच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी देखील शहरात राहणार आहे. तर, मंत्री मंडळाची बैठक होत असल्याने मोठ्या प्रमाणात आंदोलने होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 73 आंदोलन आणि 18 आत्मदहनाचे निवदेन प्रशासनाकडे आले आहेत. तसेच 8  जणांनी मोर्चे, 5 उपोषण, आणि 3 अर्ज धरणे आंदोलनासाठी आले आहेत. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांकडून देखील कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


पोलिसांकडून 8 हजार अश्रुधुराच्या नळकांड्या सज्ज...


तब्बल सात वर्षांनी मराठवाड्यात मंत्री मंडळाची बैठक होत आहे. गेल्यावाळी तत्कालीन मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बैठक बोलावली होती. त्यावेळी मोर्चेकरी शिक्षक आणि पोलिसात झालेल्या वादानंतर पोलिसांनी शिक्षकांवर लाठीचार्ज केला होता. आता सात वर्षांनी होणाऱ्या या मंत्री मंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर 73 अर्ज आंदोलनासाठी आले आहेत. त्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताची तयारी केली आहे. वेगवेगळ्या 6 जिल्ह्यातून पोलिसांचा फौजफाटा मागवण्यात आला आहे. सोबतच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 8 हजार अश्रुधुराच्या नळकांड्या सज्ज ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यापूर्वी ही संख्या 4 हजारांवर असायची, मात्र आता अतिरिक्त 4 हजार नळकांड्या ठाणे येथील शस्त्रागार विभागातून मागवले गले आहेत. यापैकी 2 हजार दाखल झाल्या असून आणखी 2 हजार दोन दिवसांत येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


मंत्रिमंडळावर धडकणार मराठा क्रांती मोर्चा..


पैठण तालुका मराठा क्रांती मोर्चातर्फे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी शुक्रवारी (15 सप्टेंबर) पैठण ते औरंगाबाद मराठा आरक्षण पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात येणार आहे. पैठण येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून सकाळी दहा वाजता मराठा आरक्षण पायी दिंडी औरंगाबादकडे मार्गस्थ होणार आहे. दिंडी पिंपळवाडी, धनगाव, ढोरकीन मार्गे बिडकीन येथील अंजली लॉन्स येथे दिंडी मुक्कामी थांबणार आहे. शनिवारी दिंडी बिडकीन येथून सकाळी सहा वाजता औरंगाबादकडे निघणार आहे. चितेगाव, गेवराई तांडा, नक्षत्रवाडी, कांचनवाडी, रेल्वेस्टेशन मार्गे मंत्रिमंडळ बैठकीच्या स्थानी नेण्यात येणार आहे. लोकशाही मार्गाने दिंडी जनजागरण करीत निघणार असून या दरम्यान दिंडीसोबत वाहन व ध्वनीक्षेपक राहणार आहे. पायी दिंडी मोर्चात समाजबांधवांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


औरंगाबाद शहराच्या रस्त्यावर पोलिसच पोलीस, तब्बल 7270 पोलिसांचा बंदोबस्त