Nashik News : वैदू समाजातील जात पंचायतीचा जाच सुरू असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले, एक रुपयाच्या भरपाईवर विवाहितेला मोबाईलवर घटस्फोट दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.  


जात पंचायतीचा जाच 


सिन्नर तालुक्यातील लोणी इथल्या तरुणाशी तरुणीचे 2019 मध्ये विवाह झाला होता, 2020 मध्ये घटस्फोट झाला, सासरच्या कुटुंबियांनी पंचाकडे केवळ एक रुपया नुकसान भरपाई देऊन मोबाईलवर घटस्फोट दिल्याचा विवाहितेचा आरोप आहे, लग्नानंतर सासरच्या व्यक्तींनी तिचा छळ केल्याने ती माहेरी सिन्नर येथे आली. याचा फायदा घेऊन सासरच्या लोकांनी लोणी व सिन्नर येथे वैदू समाजाची जातपंचायत बसविली. जातपंचायतीने या महिलेला न विचारता तिच्या अनुपस्थितीत तिचा घटस्फोट केला. त्यासाठी सासरकडील लोकांनी भरपाई केवळ एक रुपया पंचांकडे दिला. आता नवऱ्याने दुसरा विवाह केला असून जात पंचायतीच्या भीतीने पोलिसात गुन्हा दाखल केला नसल्याचा पिडीतेचा दावा आहे.


अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतली दखल
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जातपंचायत मूठमाती अभियानाने या प्रकरणाची दखल घेतलीय.  जात पंचायत विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलीय. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिलेला नसताना नवऱ्याने दुसरे लग्न केल्यास तो गुन्हा ठरतो. परंतु हे जातपंचायतीला मान्य नाही. फोनवर घटस्फोट केल्याचा घृणास्पद प्रकार सिन्नर येथे उघडकीस आला असल्याने खळबळ उडाली आहे. 


सामाजिक कार्यकर्त्यांमुळे ही बाब समोर


दरम्यान, न्यायालयाने घटस्फोट दिला नसताना पंचांच्या भूमिकेमुळे नवऱ्याने दुसरे लग्न केले. त्यामुळे जातपंचायतीच्या पंचांचा विरोध मोडून काढत ती लढायला तयार झाली. जातपंचायतीने पीडित महिलेला पोलिस ठाण्यात जाण्यापासून रोखले. तिची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने न्यायालयीन प्रकियेत न्याय मागणे तिला अवघड गेले. आठ दिवसांपूर्वी तिच्या नवऱ्याने दुसरे लग्न केल्याने तिला अन्याय असह्य झाला. सामाजिक कार्यकर्त्यांमुळे ही बाब समोर आली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :