रत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रिफायनरीबाबत पत्र लिहिलं आणि एकच खळबळ उडाली. शिवसेनेची भूमिका बदलली का? याबाबत उघडपणे विचारले जाऊ लागले. दरम्यान, याच पत्रानंतर आता कोकणातील विशेषत: राजापूर तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. उद्धव ठाकरे यांनी विश्नासात घेतले नसल्याची भावना या कार्यकर्त्यांची आहे. मुख्य बाब म्हणजे सध्या शिवसेना राज्यभर शिवसंपर्क अभियान राबवत आहे. पण, राजापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील रिफायनरीमुळे चर्चेत आलेल्या बारसू, सोलगांव, देवाचे गोठणे, गोवळ आणि शिवणे खुर्द या गावांमध्ये न जाण्याचा निर्णय सोमवारी (4 एप्रिल) झाल्याची माहिती आता समोर येत आहे.


राजापूर इथे सोमवारी दुपारी शिवसंपर्क अभियानच्या नियोजनाबाबत बैठक झाली. यावेळी रिफायनरीमुळे चर्चेत आलेल्या गावांबाबत चर्चा झाली. पण, सध्या या ठिकाणी नागरिकांमध्ये प्रचंड रोष आणि त्या ठिकाणी गेल्यास एखादा गंभीर प्रकार घडण्याची शक्यता असल्याची भावना काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर वस्तुस्थिती समजून घेत या गावांमध्ये शिवसंपर्क अभियान न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे. मुख्य गोष्ट म्हणजे आगामी काळात जिल्हा आणि तालुका स्तरावरील काही कार्यकर्ते आणि नेते आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाला रामराम करण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये राजापूर पश्चिम भागात शिवसेनेत मोठ्या उलथापालथीची शक्यता आहे. काही स्थानिक प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांच्या या पत्रामुळे आणि शिवसेनेच्या भूमिकेमुळे प्रचंड नाराज असून त्यांनी त्यांची ही अस्वस्थता 'एबीपी माझा'कडे बोलून देखील दाखवली आहे. 



बालेकिल्ल्यात नाराजीचा अर्थ काय?
मुख्य बाब म्हणजे शिवसेनेतील काही प्रमुख आणि प्रबळ मतदारसंघांमधील राजापूर-लांजा मतदारसंघ आहे. मागील 20 ते 25 वर्षे हा मतदारसंघ कायम शिवसेनेच्या मागे उभा राहिला आहे. शिवसेनेचा कोकणातील बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाकडे पाहिलं जाते. पण, सध्या रिफायनरीच्या मुद्यावरुन शिवसेनेला घेतलेली भूमिका किमान याच मतदारसंघात तरी प्रथमदर्शनी मारक ठरत असल्याचं चित्र दिसत आहे. या भागात दोन पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचा एक गट मोडत असून केवळ याच भागापुरता नाराजी कायम न राहता ती कोकणातील इतर भागात देखील वाढू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. लक्षणीय बाब म्हणजे या भागातील तरुणांमध्ये देखील शिवसेनेने फसवल्याची भावना आहे. समाजमाध्यमांच्या मदतीने सध्या कोकणातील तरुण व्यक्त होत विविध प्रश्न उपस्थित करताना दिसून येत आहे. 


फसवणुकीची भावना आणि मुंबई मनपा निवडणूक
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. कोकणी माणूस हा शिवसेनेच्या कायम उभा राहिला आहे. शिवसेनेची खात्रीची व्होट बँक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पण, सध्या शिवसेनेने शब्द फिरवल्याची भूमिका त्याच्यामध्ये दिसत आहे. त्याचवेळी नाणार येथील प्रकल्प रद्द करत बारसू इथे प्रकल्पाला पाठिंबा देत शिवसेनेने नेमकं काय साध्य केलं? दोन्ही भागांमध्ये किंवा ठिकाणांमध्ये नेमका फरक काय? असा सवाल देखील यावेळी विचारला जात आहे. 


समर्थक-उदय सामंत भेट
सोमवारी (4 एप्रिल) संध्याकाळी रिफायनरी समर्थक आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री यांची भेट झाली. यावेळी राजापूर-लांजा मतदारसंघाचे आमदार देखील यावेळी उपस्थित होते. दरम्यान, आपल्या भेटीत समर्थकांनी सामंत यांनी निवेदन दिलं आहे. यानंतर बोलताना सामंत यांनी रिफायनरी समर्थकांचं म्हणणं मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवणार असल्याची प्रतिक्रिया दिली. 


Refinery बाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना लिहिलेलं पत्र 'माझा'च्या हाती, काय लिहियलं पत्रात?