Marathi Mayboli News: महाराष्ट्र प्रतिष्ठान बंगलोरमध्ये आयोजित ओळख मायबोलीचे या ऑनलाईन मराठी शाळेच्या पाचव्या पर्वाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्ष माणिक पटवर्धन उपस्थित होत्या. कोरोनाच्या महामारीनं ऑनलाईन शाळा हा पर्याय जगाला मिळाला आणि मराठी प्रतिष्ठान बंगळुरुने त्याचा उपयोग मायबोली संवर्धनासाठी करायचा ठरवले आणि त्यातूनच "ओळख मायबोलीची " या संकल्पनेचा जन्म झाला.
सोशल मिडीयाचा उपयोग करून 'शाळा सुरू करत आहोत.' असा मेसेज पोस्ट केल्यानंतर तिथून या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला. शिक्षक आणि विद्यार्थी दोन्हींचा उत्तम प्रतिसाद या शाळेला मिळतोय. शिक्षक म्हणून ज्यांनी होकार दर्शविला, ते पेशाने शिक्षक नव्हते तर हौसेने शिकवायला तयार होते.
शिक्षकांनी वारंवार मिटिंग घेऊन अभ्यासक्रम तयार केला. लॉकडाऊन असल्याने हाती असलेल्या साहित्यातून शिकवायचे होते. सगळ्या दृष्टीने विचार करून, गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधून 5 जुलै 2020 ला "ओळख मायबोलीची" ही ऑनलाईन मराठी शाळा सुरू झाली. पहिल्या पर्वात जपान आणि अमेरिकेतून विद्यार्थी दाखल झालेले पाहून आपल्या भाषेची ओढ काय असते, याची जाणीव उपक्रम सुरु करणाऱ्या आयोजकांना झाली.
तीन महिने शाळा चालवून बघू असा विचार करणारे आयोजक आणि शिक्षक शाळा सुरूच ठेवू या निर्णयापर्यंत येऊन पोहोचले आहेत. या अनोख्या शाळेत भाषेबरोबरच आपले सणवार, संस्कृती, गाणी गोष्टी, श्लोक यामध्ये मुलं रमत आहेत. महाराष्ट्र दिन, मराठी भाषा गौरव दिन, पंढरीची वारी, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी असे सण आणि दिवस या माध्यमातून ऑनलाईन साजरे केले जात आहेत.
दरम्यान बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी घेतल्या जाणाऱ्या मराठी निबंध स्पर्धा आणि मराठी भाषा, संस्कृती ज्ञान परीक्षा या जागतिक पातळीवर घेतल्या जातात. याचं ऑक्टोबर 2021 पासून मराठी प्रतिष्ठान बंगळुरु मधील केंद्र सुरू झाले. या परीक्षांमधून दरवर्षी अनेक विद्यार्थ्यांना पुरस्कारांनी सन्मानीत केलं जाते. या परीक्षेमुळे "सुलभ भारती" ही महाराष्ट्र शासनाची पुस्तकं मुलांना समजली.
ही शाळा निःशुल्क असल्याने पुस्तकं पालकांना घ्यायला सांगायची असे ठरले. पण बंगळुरूमध्ये मराठी पुस्तके ती सुद्धा शासनाची मिळणे अशक्यच होते. त्यामुळे पुस्तके पुण्याहून मागवून ती उद्घाटनदिवशी सशुल्क द्यायची असे ठरले. पण चांगल्या उपक्रमात आपलाही सहभाग असावा म्हणून श्रीधर धावड यांनी सगळी पुस्तके त्यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना भेट दिली.
शाळा ऑनलाईन असल्याने शिक्षक आणि विद्यार्थी यांची प्रत्यक्ष भेट झालीच नव्हती. यावेळी पाचव्या पर्वाच्या निमित्ताने सगळे एकत्र जमले होते. आजपर्यंत जवळ जवळ 450 मुलांनी ह्या शाळेचा लाभ घेतला आहे. बंगळुरुमधील मुलांबरोबरच पुणे, हैदराबाद, जपान, सौदी, स्पेन, लंडन आणि अमेरिकेतून मुले या शाळेत सहभागी झाली आहेत. मराठी भाषा शिकण्यासाठी बंगळुरुमधून सुरु असलेल्या या अनोख्या उपक्रमाचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.