Sugar Prices in India: सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक फटका बसू शकतो. ऐन सणासुदीच्या काळात साखरेचा (Sugar) गोडवा कमी होऊ शकतो. सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी साखरेच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वात जास्त साखर उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात साखरेच्या उत्पादनात घट झाली आहे. यंदा राज्यातील साखर उत्पादनात 14 टक्क्यांपर्यंत घट दिसून येत आहे. मागील चार वर्षांतील उत्पादनाच्या तुलनेत यंदा राज्यात साखरेचं सर्वात कमी उत्पादन झालं आहे.
उत्पादन घटण्यामागील कारण काय?
यंदा महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये अपेक्षेपेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिना हा सर्वात कोरडा महिना ठरला आहे आणि याचा थेट परिणाम ऊस उत्पादनावर होऊ शकतो. ऊस उत्पादनात घट झाल्यास सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसू शकतो.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठं साखर उत्पादक राज्य आहे. त्यानंतर कर्नाटक राज्याचा नंबर लागतो. या दोन्ही राज्यांत यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, त्याचा परिणाम ऊस उत्पादनावर होण्याची शक्यता असल्याचं व्यापारी आणि उत्पादकांनी देखील म्हटलं आहे.
सप्टेंबरमध्ये पाऊस झाल्यास ठरेल फायदेशीर
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सप्टेंबर 2023 मध्ये अनेक राज्यांमध्ये सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाऊस झाल्यास ऊसासह इतर पिकांसाठी ही चांगली बाब ठरेल. साखरेचं उत्पादन वाढवण्यासाठी ते उपयुक्त ठरू शकेल.
साखर निर्यातीवर येऊ शकते बंदी
इंडिया टुडेच्या बातमीनुसार, ऑगस्टमध्ये कमी पाऊस आणि साखरेचं कमी उत्पादन यामुळे साखरेच्या निर्यातीवरही परिणाम होऊ शकतो. ऑक्टोबरमध्ये सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सरकार साखरेच्या निर्यातीवर बंदी घालू शकते, असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. साखर उत्पादनात घट दिसून आल्यास सरकार ऑक्टोबरमध्ये सात वर्षांनंतर साखरेच्या निर्यातीवर बंदी घालू शकते.
दीड महिन्यात साखरेच्या दरात 4 रुपयांनी वाढ
साखरेचे दर आधीच तीन टक्क्यांची वाढलेले आहेत. चालू सप्टेंबर महिन्यात साखरेचे दर हे 48 रुपये किलोपर्यंत गेले आहेत. मागील दीड महिन्यात साखरेच्या दरात चार रुपयांची वाढ झाली आहे. सध्या साखरेचे दर हे 37 हजार 760 रुपये प्रति टनापर्यंत वाढले आहेत. ऑक्टोबर 2017 नंतरचा हा सर्वोच्च दर आहे. साखरेच्या दरात वाढ झाल्यानंतर व्यापारी आणि उत्पादकांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.
हेही वाचा: