मुंबई: छत्रपती घराण्याच्या तलवारीची ख्याती आहे, आज या राजघराण्याला मराठा समाजाच्या मागण्यासाठी उपोषण करावं लागतंय. संभाजीराजेंना उपोषण करावं लागलं हा माझा आयुष्यातील काळा दिवस आहे असं शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी म्हटलंय. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी धैर्यशील माने त्या ठिकाणी पोहोचले आहेत.
खासदार धैर्यशील माने म्हणाले की, "माझे राजे उपाशी असताना मी घरात कसा बसेन? मी इथं छत्रपतींचा मावळा म्हणून आलोय. दिल्लीमध्ये आम्ही राजेंच्या सोबत लढतोय. आज मराठा समाजाच्या मागण्यांसाठी राजघराण्याला उपोषणासाठी बसावं लागतंय हा माझ्या आयुष्यातील काळा दिवस आहे."
खासदार संभाजीराजेंच्या उपोषणाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आझाद मैदानावर आलेले खासदार धैर्यशील माने हे पहिलेच शिवसेना प्रतिनिधी आहेत.
खासदार धैर्यशील माने म्हणाले की, "महाविकास आघाडीच्या या संदर्भात बैठका सुरू आहेत. काहीही करून आजचा दिवस उलटता कामा नये. मी या संबंधी मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाने मांडणार असून यावर लवकरच सकारात्मक निर्णय होईल."
आझाद मैदानावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे आमरण उपोषण सुरू झाले आहे. यावेळी त्यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती या देखील आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. संयोगिताराजे छत्रपती म्हणाल्या की, "संभाजीराजे आमरण उपोषणाला बसले आहेत, ही वेळ यायला नको होती. परंतु सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे ही वेळ राजेंवर आली आहे. मी स्वतः शेवटपर्यंत आंदोलनात सहभागी राहणार आहे."
आपला लढा हा 30 टक्के श्रीमंत मराठ्यांसाठी नाही तर गरीब मराठा समाजासाठी असल्याचे संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Sambhaji Raje Chhatrapati Protest : मराठा आरक्षणासाठी आजपासून संभाजीराजेंचा एल्गार, मुंबईत आमरण उपोषण
- Maratha Reservation: 'माझा लढा श्रीमंत मराठ्यांसाठी नाही तर गरीब मराठा समाजासाठी', खासदार संभाजीराजेंचं उपोषण सुरु
- Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात रास्ता रोको, वाहतुकीवर परिणाम