Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी गेल्या 16 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे उपोषण करत आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा 17 वा दिवस आहे. दरम्यान, मध्यरात्री सरकारच्या शिष्टमंडळाची मनोज जरांगे पाटील यांच्याशी 40 मिनीटं चर्चा झाली. त्यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाशी बंद दाराआड चर्चा केली. चर्चा सकारात्मक झाली असून, सकाळी मुख्यमंत्र्यांचा निरोप आल्यावर समाधानी आहे की नाही हे कळेल. आज दिवसभर त्यांची वाट पाहू अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.
चर्चा समाधानकारक, सरकार अरक्षणाबाबत गंभीर : रावसाहेब दानवे
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि मंत्री गिरीश महाजन हे उपोषणस्थळी अंतरवाली सराटी गावात दाखल झाले होते. मध्यरात्री त्यांनी जरांगे पाटलांसह त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. आज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 17 वा दिवस आहे. त्यांच्या उपोषणाला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं. मी आणि आमच्या राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे यांच्या टीमसोबत चर्चा केली आहे. चर्चा समाधानकारक झाली. सरकार अरक्षणाबाबत गंभीर आहे. आजच्या चर्चेनंतर जे मुद्दे समोर आले त्या मुद्द्यांवर आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असे रावसाहेब दानवे म्हणाले. मी दिल्लीवरुन आलो, गिरीश महाजन मुंबईवरुन आल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले.
आमरण उपोषण सोडतो पण...
उपोषण सोडा म्हणतात पण सोडवायला कुणीही येत नाही. हे आरक्षणाप्रमाणेच झालं, देतो म्हणतात पण देत नाहीत अस जरांगे पाटील म्हणाले. सरकारच्या दोन अटी होत्या. एक महिना वेळ द्या आणि आमरण उपोषण सोडा असं सांगण्यात आलं. पण सर्वांनी सांगितलं की आरक्षणासाठी 40 दिवस द्या, तेही दिलं. पण मंत्री आता आमच्यावरच खापर फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येतंय. मी शेवटी म्हटलं की आमरण उपोषण सोडतो पण साखळी उपोषण सोडणार नाही. आरक्षण मिळाल्याशिवाय हे उपोषण सोडणार नाही.
सुरक्षेच्या कारणास्तव मुख्यमंत्र्यांचा जालना जिल्हा दौरा रद्द
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या भेटीसाठीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काल नियोजित जालना दौरा होता. मात्र तो दौरा रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव जालन्यात जाऊ नये असं पत्र आल्यानं हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. मराठा आरक्षणासाठी सलग सतरा दिवस उपोषण करणारे मनोज जरांगेंनी सर्वपक्षीय बैठकीनंतर उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. परंतु हे उपोषण सोडताना मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळानं यावं अशी एक अट जरांगेंनी घातली होती. मुख्यमंत्र्यांकडून ती अट मान्यही करण्यात आली होती. परंतु पत्रकार परिषदेआधीची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची कुजबूज सोशल मीडियावर व्हायरल झाली. या व्हायरल व्हिडीओवर मुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरणही द्यावं लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: