सोलापूर : सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत मराठा संघटनांचं आंदोलन सुरुच आहे. एक मराठा, लाख मराठाची घोषणा देत, काल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुंबईत एकाच वेळी वेगवेगळ्या 20 ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले. अशातच आज मराठा आरक्षण स्थगिती विरोधात आज सोलापूर बंदची हाक मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे सोलापुरात आज सकाळपासूनच बंदला सुरुवात झाली आहे. माढ्यात तर रस्त्यावर टायर जाळून मराठा समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून सोलापुरात एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात पोलिसांचा मोठा फौजफाट तैनात आहे.


सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षण स्थिगिती विरोधात आज बंद पुकारण्यात आला आहे. तर जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार यांच्या घरासमोर देखील आंदोलनं करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागात माढामध्ये उग्र स्वरूपाच्या निदर्शने करून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. तर शहरात सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्याघरासमोर आंदोलनसाठी कार्यकर्ते एकत्रित जमणार आहेत. शहरात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे.


पाहा व्हिडीओ : आरक्षण स्थगितीविरोधात आज सोलोपूर बंदची हाक; माढ्यात टायर पेटवून सरकारचा निषेध



मराठा आरक्षण स्थगिती प्रकरणी आज पुकारलेल्या सोलापूर जिल्हा बंदमध्ये आंदोलकांनी पंढरपूर पुणे महामार्ग रोखून धरला. माढ्यात रस्त्यावर टायर जाळल्यानंतर वेळापूरच्या पुढे असणाऱ्या निमगाव पाटीजवळ मराठा तरुणांनी रस्त्यावर टायर पेटवून रस्ता अडवला. एक मराठा लाख मराठाच्या जोरदार घोषणा देत दोन्ही बाजूनी वाहतूक आंदोलकांनी रोखून धरली.


आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात एसटी सेवा बंद


सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास सध्यस्थितीत स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ 21 सप्टेंबर 2020 रोजी मराठा समाज व मराठा आरक्षणाशी संबंधित असणाऱ्या सर्व संघटनांच्यावतीने सोलापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या बंद काळात एसटी बसेसच्या तोडफोडीसारखे प्रकार घडू शकतात. म्हणून एसटीच्या तोडफोडीसारखे प्रकार घडू नयेत म्हणून 21 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजून 01 मिनिटांपासून ते 21 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यातील एसटी सेवा बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.


मराठा आरक्षणासाठी मुंबईत 20 ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचं ठिय्या आंदोलन


सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणावर स्थगिती लावल्यानंतर, चांद्यापासून बांद्यापर्यंत मराठा संघटनांचं आंदोलन सुरुच आहे. एक मराठा, लाख मराठाची घोषणा देत, आज मराठा क्रांती मोर्चा मुंबईत रविवारी (20 सप्टेंबर) एकाच वेळी वेगवेगळ्या 20 ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग आणि इतर खबरदारी घेत हे आंदोलन करण्यात येत आहे. कुर्ला, वडाळा, चेंबूर, मानखुर्द, वरळी, वांद्रे, बोरिवली, कांदिवली, विक्रोळी, घाटकोपर, मुलुंड अशा महत्त्वाच्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आली.


महत्त्वाच्या बातम्या :