मुंबई : सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणावर स्थगिती लावल्यानंतर, चांद्यापासून बांद्यापर्यंत मराठा संघटनांचं आंदोलन सुरुच आहे. एक मराठा, लाख मराठाची घोषणा देत, आज मराठा क्रांती मोर्चा मुंबईत एकाच वेळी वेगवेगळ्या 20 ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग आणि इतर खबरदारी घेत हे आंदोलन करण्यात येत आहे. कुर्ला, वडाळा, चेंबूर, मानखुर्द, वरळी, वांद्रे, बोरिवली, कांदिवली, विक्रोळी, घाटकोपर, मुलुंड अशा महत्त्वाच्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आली.


घाटकोपर : अनेक कार्यकर्ते रस्त्यावर बसून घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत.घाटकोपर पूर्वेला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. घाटकोपर पूर्वेला पंतनगर मध्ये पोलिस स्टेशन जवळ असलेल्या जंक्शन वर या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.


जोगेश्वरी : जोगेश्वरी शाम नगर परिसरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलं. हातात भगवे झेंडे, फलक आणि काळ्या रिबीन लावून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.


लालबाग : मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आंदोलनाला सुरुवात झाली आहे. सध्याच आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू आहे परंतु जर मागणी मान्य झाली नाही तर आम्ही आंदोलनाच स्वरूप तीव्र करू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राजन घाग यांनी दिला आहे.


चेंबूर : मुंबईत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चेंबूर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले. सोशल डिस्टनसिंग पाळून कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी सकल मराठा समाज आणि शिवसेनेचे देखील कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे हीच एक मागणी घेऊन आज आंदोलन करण्यात आले. दरम्यान आंदोलकांनी हिंसक होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.