जालना : मराठा आरक्षण (Maratha Reservation) संबंधी मुंबई (Mumbai) येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडणार असून, मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना पत्र पाठवून या बैठकीत सहभागी होण्याची विनंती केली आहे. या विनंतीला अनुसरून मनोज जरांगे हे आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या बैठकीमध्ये सहभागी होणार आहे. दुपारी 2 वाजता ही बैठक होणार असून, यात मराठा आरक्षण विषयक परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे आपल्या प्रलंबित मागण्या जरांगे यांच्याकडून या बैठकीत मांडल्या जाण्याची शक्यता आहे.
शंभुराज देसाई यांचे मनोज जरांगेंना पत्र...
दरम्यान शंभुराज देसाई यांनी मनोज जरांगे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, "मराठा आरक्षण विषयासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया, कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरू असलेली कार्यवाही व एकूणच मराठा आरक्षण विषयाशी संबंधीत सर्व विषय व कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय आढावा बैठक 2 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता मुंबई येथे आयोजित केली आहे. त्यामुळे, मराठा आरक्षणा संदर्भात आपल्या असणाऱ्या आग्रही भूमिकेच्या अनुषंगाने या बैठकीस आपण उपस्थित राहून, आपली भूमिका मांडावी. तसेच न्यायालयीन प्रक्रियेत मराठा आरक्षणाच्या बाजूने मांडावयाची आपली मते या बैठकीत सहभागी होऊन आपण मांडावीत. याकरिता, सदर बैठकीस आपण उपस्थित रहावे, अशी विनंती मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचा सदस्य या नात्याने आपणास करीत असल्याचे शंभुराज देसाई यांनी मनोज जरांगे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
मनोज जरांगे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या बैठकीमध्ये सहभागी होणार
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत उपोषण करण्याची घोषणा केली असून, यासाठी 20 जानेवारीला मुंबईच्या दिशीने निघणार असल्याचे म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर सरकार देखील कामाला लागले आहेत. त्यानुसार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय आढावा बैठक मुंबईमध्ये बोलवण्यात आली आहे. यासाठी मनोज जरांगे यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे. तर, मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य शंभुराज देसाई यांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या बैठकीमध्ये सहभागी होणार आहे.
मराठा कुणबी नोंदी शोधणाऱ्या समितीचे काम ठप्प?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आठवडाभरापूर्वी शिंदे समितीची कुणबी नोंदी शोधण्यासाठी तिसरा अहवाल सादर करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. माञ, शासनाने कार्यादेश व कार्यकक्षा जारी न केल्याने समीतीने अद्याप कामकाज सुरू केलेले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली याच आठवड्यात बैठक होणार असून, त्यात कार्यकक्षा आणि कार्यादेश ठरवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, आजच्या बैठकीत यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: