Deepak Kesarkar on Manoj Jarange मुंबई : मराठा वादळ मुंबईपर्यंत जाऊन पोहोचले आहे. मराठा आंदोलकांनी सीएसटीच्या बाहेर आंदोलन सुरु केले आहे. आजचा दिवस (26 जानेवारी) मराठा आरक्षणासाठी निर्णायक राहणार आहे. सरकारी पातळीवर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे शिष्टमंडळ पाठवून तोडगा निघतो का? पाहिलं जात आहे. यावर मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्री केसरकर म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या मान्य झाल्या आहेत. शासकीय विहित नियम असतात त्यानुसार अंमलबजावणी होईल. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असे घडले की आपण 37 लाख कुणबी प्रमाणपत्र दिले होते. परंतु आता आणखी देऊन 50 लाखांच्या वर ही संख्या जाणार आहे.
सर्व यंत्रणा लागल्या कामाला
मुंबई ठप्प होणे हे देशाच्या दृष्टीने योग्य नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेऊन यंत्रणा कामाला लावली आहे. शेवटी प्रताप परंपरेचा मान ठेवणे ही सुद्धा राज्याची संस्कृती राहिली आहे. किती अधिकारी भेटायला गेले, किती नेते भेटायला गेले, राज्य शासन हे राज्य शासन असतं. सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. मनोज जरांगेनी मान ठेवला पाहिजे, त्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांना भेटून आनंद नक्कीच साजरा करतील, असे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.
दीपक केसरकर यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना
भारतीय प्रजासत्ताकाच्या ७५ वा वर्धापन दिनानिमित्त शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात साकेत मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर राष्ट्रपती पुरस्कार विजेते व विविध पुरस्कार विजेते अधिकारी कर्मचारी व नागरिकांचा सत्कार यावेळी दीपक केसरकर यांच्या हस्ते पार पडला.
मनोज जरांगे समजूतदार, ते योग्य निर्णय घेतील - उदय सामंत
मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर मंत्री उदय सामंत म्हणाले की, एखादी मागणी पूर्ण होत असेल तर आंदोलन करणं ठीक आहे का? सरकार सर्व मागण्या मान्य करत असेल तर हे कशासाठी? मनोज जरांगे समजूतदार आहेत. त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील. मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी मराठा समाजाने घ्यावी. तोडगा निघाला पाहिजे मी या मताचा आहे. मी प्रचंड सकारात्मक आहे. मराठा आरक्षणासंदर्भात नक्की मार्ग निघेल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर सर्व करून देत असतील या तिघांसाठी चर्चेचा हट्ट धरू नये, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे?
छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुढची चर्चा आपण करूया. राज्य सरकारच्या शिष्टमंडळांना जीआरसाठी जी काय कागदपत्रे समोर ठेवली आहेत त्यात काय दुरुस्ती आहे, त्यात नेमक्या कोणत्या मागण्या मान्य होत आहेत, ते सगळं आपण चर्चा करून ठरवू. कोणताही निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही, सगळ्यांसमोर चर्चा करून निर्णय घेईल, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.
शिंदे समितीच्या माध्यमातून दिवसरात्र काम सुरू - दादा भुसे
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे याबद्दल दुमत नाही, इतर आरक्षणाला धक्का न लागता कायद्याच्या चौकटीत असणारे आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे. सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न प्रलंबित आहे. शिंदे समितीच्या माध्यमातून दिवसरात्र काम सुरू आहे. सर्वच जण प्रयत्न करत आहे, काय काय केलं हे सर्व त्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे. मागासवर्गीय समितीच्या माध्यमातून डेटा कलेक्ट करत आहेत. दीड लाख कर्मचारी काम करत आहेत, मुख्यमंत्री चर्चेसाठी अंतरवलीला सुद्धा गेले होते, असेही दादा भुसे म्हणाले.
आणखी वाचा