अकोला :  काही माणसांच्या दिलदारपणाचं कौतुक करावं तितकं थोडंच असतं. असाच दिलदार माणूस अकोल्यात पाहायला मिळाला. मुरलीधर राऊत असं या दिलदार व्यक्तीचं नाव आहे.

कारण नोटांच्या तुटवड्यामुळे प्रवाशांकडे पैसे नाहीत. त्यामुळे मुरलीधर राऊत यांनी त्यांच्या मराठा हॉटेलमध्ये बाहेरगावावरुन आलेल्या प्रवाशांना मोठी मदत केली आहे.

बाहेरगावावरुन आलेल्या फॅमिलींना त्यांनी हॉटेलमध्ये अक्षरश: फुकटात जेवण दिलं आहे. बाहेरगावच्या प्रवाशांनी हॉटेलमध्ये या, भरपूर खा, पैशाची काळजी करु नका, पुढच्यावेळी याल तेव्हा पैसे द्या, अशी ऑफर त्यांनी दिली आहे.

मुरलीधर राऊत यांनी दाखवलेल्या या माणुसकीमुळे अनेक भुकेल्या प्रवाशांना पोटभर अन्न मिळालं आहे. नोटा बंदीनंतर पहिल्या दिवशी या हॉटेलमध्ये सुमारे दीडशे प्रवाशांनी जेवण केलं, तर दुसऱ्या दिवशीही शंभर जणांना या हॉटेलने जेऊ घातलं.

अकोल्यातील नॅशनल हायवे क्रमांक 6 वर बाळापूर इथं मराठा हॉटेल आहे. या हॉटेलचा सूचना देणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय  8 नोव्हेंबरला जाहीर केला. त्या दिवशी मध्यरात्रीपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली.

या निर्णयाचं बहुतेकांनी स्वागत केलं, पण काळेपैसेवाल्यांचे धाबे दणाणले. मात्र या निर्णयाचा फटका प्रवाशांनाही बसला. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.

500-हजाराच्या नोटा हॉटेल चालकांनी न स्वीकारल्यामुळे जेवणाचीही पंचाईत झाली. मात्र अकोल्यातील 'मराठा हॉटेल'च्या मालकांनी जी माणुसकी दाखवली आहे, त्याला तोड नाही.