दुपारनंतर ATM सुरु होण्याची चिन्हं, बँकांंसमोर रांगा
एबीपी माझा वेब टीम | 11 Nov 2016 10:29 AM (IST)
मुंबई: नरेंद्र मोदी सरकारच्या नव्या अर्थक्रांतीला सामान्यांनी पाठिंबा दिला असला, तरी आता मात्र तेच सामान्य लोक, आर्थिक व्यवहार ठप्प झाल्यानं मेटाकुटीला आले आहेत. आज सकाळपासून एटीएम सुरु होणार असल्याचा वादा खुद्द मोदींनी आणि बँकांनी केला होता. पण राज्यभरातल्या एटीएमचे शटर आजही डाऊन असल्यानं लोकांची पंचाईत झाली आहे. आज दुपारनंतर एटीएममधून पैसे काढता येऊ शकतील. नोटा बदलण्यासाठी 5 सोप्या टिप्स काल रात्रभर एटीएममध्ये पैसे भरण्याचं काम सुरु होतं. पण ते काम आजही सुरु राहिल्यानं एटीएममधून पैसे काढताच येत नाहीत. तुमच्या ATM वरुन किती पैसे काढू शकाल? या सगळ्याचा थेट परिणाम बँकांच्या सेवांवर झाला आहे. कारण एटीएममध्ये पैसे न मिळालेले ग्राहक पैसे काढण्यासाठी बँकांसमोर जाऊन रांगेत उभे आहेत. तर दुसरीकडे नोटा बदलण्यासाठीच्या रांगाही वाढत चालल्या आहेत. त्यामुळे वीकेन्डच्या तोंडावर झालेल्या आर्थिक उपवासामुळे ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. दरम्यान असं असलं, तरी शनिवार आणि रविवार काम सुरु ठेऊन बँकांनीही सामान्य ग्राहकांना सेवा पुरवण्याची हमी दिली आहे. जुन्या नोटांनी बिलं भरा दुसरीकडे पेट्रोलपंप, टोल, एसटी प्रवास, वीज बिल यासाठी केवळ आजच जुन्या नोटा तुम्हाला वापरता येणार आहेत. कारण, सरकारनं याठिकाणी जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी जी मुदत दिली होती. ती आज मध्यरात्रीनंतर संपते आहे. त्यामुळे उद्यापासून तुम्हाला तुमच्याकडच्या पाचशे आणि हजाराच्या नोटा बदलून घ्यायच्या असतील, तर केवळ बँक आणि पोस्ट ऑफिस हे दोनच एकच पर्याय तुमच्याकडे शिल्लक असणार आहे. वाद होऊ नयेत, म्हणून मुंबई पेट्रोलपंप असोसिएशननं मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पेट्रोलपंप बंद ठेवण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुमच्याकडच्या जुन्या नोटांच्या माध्यमातून तुम्हाला वीज, संपत्ती कर, वा पाणीपट्टी अशी बिलं भरायची असतील, तर ती आजच भरणं गरजेचं आहे. बँकांचा निर्णय ग्राहकांचा त्रास कमी करण्यासाठी बँकांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय. 31 डिसेंबरपर्यंत ग्राहकांकडून एटीएमच्या ट्रॅन्झॅक्शनवर कोणतंही अतिरिक्त शुल्क न आकारण्याचा निर्णय झाला आहे. सध्या आयसीआयसीआय, पंजाब नॅशनल, आयडीबीआय बँकेनं हा निर्णय घेतला आहे. याशिवाय इतर बँकाही या निर्णयाचं अनुकरण करण्याची शक्यता आहे. आतापर्यंत महिन्याभरात एटीएमवर 5 ट्रॅन्झॅक्शन मोफत होते. मात्र आता ग्राहकांना 31 डिसेंबरपर्यंत कितीही वेळा ट्रॅन्झॅक्शन करता येणार आहे. ज्यावर कोणतंही शुल्क नसेल. बँक आणि पोस्ट ऑफिस तुमचं खातं असलेल्या कोणत्याही बँकेत, कोणत्याही शाखेत 30 डिसेंबरपर्यंत दिवसाला 4 हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून घेता येतील. पण त्यासाठी रिझर्व्ह बँकेने जारी केलेला फॉर्म भरून द्यावा लागेल. केवळ पैसे बदलण्यासाठीच हा फॉर्म भरावा लागेल. तुमच्या खात्यात पैसे भरायचे असतील, तर या फॉर्मची गरज नाही. पैसे बदलण्यासाठी पॅन कार्ड आणि आधारकार्ड किंवा मान्यताप्राप्त ओळखपत्र सोबत असणं आवश्यक आहे. समजा तुमच्याकडे 500 रुपयाच्या 20 नोटा म्हणजे 10 हजार रुपये असतील, तर त्यापैकी 4000 रुपयेच एका दिवसात बदलून मिळतील. म्हणजे तुमच्याकडच्या 500 रुपयाच्या 8 नोटाच बँकेत/पोस्टातून एका दिवसात बदलून घेता येऊ शकतील. परत दुसऱ्या दिवशी हीच प्रक्रिया असेल. पण तुम्ही तुमच्या खात्यावर कितीही रक्कम भरू शकता. केवळ बदलून घेण्यासाठीच 4 हजार रुपयांची ही मर्यादा असेल. 10 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरपर्यंत दिवसाला 4 हजार रुपये तुम्ही बदलून घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये वाढ होईल. पैसे बदलण्यासाठी मर्यादा, मात्र अकाऊंटमध्ये भरण्याला नाही बँकेतून पैसे बदलून घेण्यासाठी मर्यादा आहेत, मात्र तुमच्याकडे 500 किंवा हजार रुपयाच्या कितीही नोटा असतील, तर त्या डिपॉझिट करण्यासाठी किंवा खात्यावर भरण्यासाठी मर्यादा नाही. त्यामुळे तुमच्याकडील सर्व पैसे तुमच्या खात्यावर भरल्यास काहीही अडचण नाही. खात्यावरुन किती पैसे काढू शकाल? तुम्ही तुमच्या खात्यावरील दिवसाला 10 हजार रुपये आणि आठवड्याला 20 हजारपर्यंतची रक्कम काढू शकाल. समजा तुम्ही उद्या 8 हजार रुपये काढले, तर तुम्हाला आठवडाभरात 12 हजार रुपयेच काढता येतील. पण प्रत्येकवेळी तुम्हाला दहा हजारची मर्यादा असेल.(त्यामुळे 12 हजार काढायचे असतील तर दहा हजार निघतील, त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन हजार काढावे लागतील) त्यानंतर पुढच्या आठवड्यात पुन्हा 20 हजार रुपये काढता येतील. ही मर्यादा नोटांचा पुरेसा साठा उपलब्ध होईपर्यंत असेल. त्यानंतर कोणतीही मर्यादा नसेल. प्रत्येक एटीएमवरुन दिवसाला 2 हजार रुपयांची मर्यादा तुमच्या अकाऊंटवर कितीही रुपये असले तरी एटीएमवरुन तुम्ही दिवसाला एका कार्डवरुन 2 हजार रुपयेच काढू शकाल. 18 नोव्हेंबरपर्यंत ही मर्यादा असेल.त्यानंतर ही मर्यादा 4 हजारपर्यंत वाढवण्यात येईल. ही मर्यादा नोटांचा पुरेसा साठा उपलब्ध होईपर्यंत असेल. त्यानंतर कोणतीही मर्यादा नसेल.