बीड : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक असलेले मास्क आणि सॅनिटायझरचा मोठा तुटवडा सध्या बाजारामध्ये निर्माण झाला. त्यामुळे बनावट सॅनिटायझरची निर्मिती करणाऱ्यांचं प्रमाणही वाढलं आहे. मात्र आता सॅनिटायझरचा तुटवडा कमी होणार आहे, कारण आपल्या साखर कारखान्यांतून तयार होणारे सॅनिटायझर लवकरच बाजारामध्ये उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्र सरकारने राज्यातील एकूण 37 प्रकल्पांना सॅनिटायझर निर्मितीची परवानगी दिली आहे. सध्या रोज दोन लाख लिटर सॅनिटायझरची निर्मिती यामध्ये होत आहे.


कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार महाराष्ट्र सरकारने राज्यातील साखर उद्योगाला सॅनिटायझर उत्पादन सुरू करण्यास परवाने मंजूर केले. महाराष्ट्रात एकूण साखर कारखान्यांपैकी 110 साखर कारखान्याकडे अल्कोहोल निर्मिती प्रकल्प आहेत. यापैकी 80 अल्कोहोल निर्मिती प्रकल्प यावर्षी सुरु होते. या साखर कारखानदारांनी सॅनिटायझर बनवण्यासंदर्भात सकारात्मकता दाखवली आहे. सॅनिटायझर बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे अल्कोहोल आहे. ज्या साखर कारखान्यांकडे अल्कोहोल निर्मिती प्रकल्प आहेत, त्यांनी सॅनिटायझर
बनवायला सुरुवात केली आहे..


सध्या राज्यात सगळीकडेच सॅनिटायझरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यातच बाजारातील मागणीचा फायदा घेऊन अनेकांनी सॅनिटायझरचा काळाबाजार केल्याचंही उघड झालं आहे. म्हणून साखर कारखान्यातून तयार होणारे सॅनिटायझर बाजारात आल्यास लोकांना याचा मोठा फायदा मिळणार आहे. विशेष म्हणजे साखर कारखान्यातून तयार होणारे सॅनिटायझर हे इतर सॅनिटायझरच्या तुलनेनं स्वस्त असणार आहे.


सॅनिटायझर बनवण्यासाठी 70 टक्के अल्कोहोल त्यानंतर ग्लिसरीन आणि वॉटर कलरचा वापर होतो. साखर कारखान्यातून तयार होणारे सॅनिटायझर हे 100 मिलीलिटरपासून एक लिटरपर्यंतच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध होणार आहे. सध्या कोल्हापूर साखर कारखाना तसेच पुण्याचा लोकरंजन प्रकल्प, सांगलीच्या वसंतदादा पाटील शुगर आणि राजाराम बापू साखर कारखान्यातून प्रत्यक्ष सॅनिटायझर उत्पादनास सुरुवात झाली आहे. या साखर कारखान्यांना पुढच्या तीन महिन्यासाठी सॅनिटायझर बनवण्यासाठीची परवानगी देण्यात आली आहे..


सध्या या सगळ्या साखर कारखान्यातून दोन लाख लिटर म्हणजे 100 मिलीलीटरच्या तब्बल 20 लाख बॉटल्स तयार होत आहेत. भविष्यातील एकूण साखर कारखाने मागितलेली परवानगी लक्षात घेता, अंदाजे चार ते पाच लाख लिटर सॅनिटायझरचं रोज उत्पादन महाराष्ट्रात होणार आहे. त्यामुळे आगामी काळात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लोकांना सहज आणि किफायतशीर किमतीमध्ये सॅनिटायझर मिळणार आहे.


संबंधित बातम्या :