पालघर : गोवंशाच्या जनावरांची तस्करी करुन पोलिसांच्या वाहनाला ठोकर मारून भरधाव वेगात पळून जाणाऱ्यांना यशस्वीरित्या पोलिसांनी अटक केली आहे. मनोर पोलिसांनी ही कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले आहे. यावेळी तब्बल एक टन गोमांस जप्त केले आहे. रविवारी (ता.2 जानेवारी) सकाळी सात वाजताच्या सुमारास मनोर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान जप्त केलेल्या कार मधून दोन जीवंत बैल आणि पीक अप टेम्पो मधून गोमांस जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


मनोर वाडा रस्त्यावरून गोवंशाच्या जनावरांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मनोर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी पहाटे तीन वाजता मनोर-वाडा रस्त्यावरील टेन नाका येथे नाका बंदी केली. ज्यावेळी सकाळी सात वाजताच्या सुमारास महामार्गावरून टेन नाक्याच्या दिशेने आलेल्या संशयास्पद कार आणि पीक अप टेम्पो चालकाला पोलिसांना थांबण्याचा इशारा दिला. परंतु कार चालकाने नाका बंदीवरील पोलिसांच्या वाहनाला ठोकर मारून कार महामार्गावर वळवून गुजरातच्या दिशेने पळवली. ज्यानंतर पोलिसांनी पाठलाग करुन कारला रोखण्यात यश मिळवलं. यावेळी विक्रमगडच्या हद्दीत भोपोली गावातील नागरिकांनी देखील पोलिसांची मदत करत आरोपींना अटक केले. यावेळी गुंगीत असलेले दोन जीवंत बैल आणि कार मनोर पोलीसांनी जप्त केली आहे.


मनोर पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक 01 / 2022 याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम 353,279,337,307,379, 338,429,34 सह महाराष्ट्र प्राणी संवर्धन कायदा 1976 चे कलम 6,9,11,महाराष्ट्र प्राणी रक्षणा ( सुधारणा ) अधिनियम 1995 चे कलम 5.5 ( सी )9, 9 ( अ ) , 9( बी ) सह मोटार वाहन अधिनियम कलम 139, 177,184,187,134 ( अ ) ( ब )66( 1) 192 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शब्बीर अहमद शगिर अहमद शेख,(वय 50), शरीफ हनिफ कुरेशी (वय.35) आणि तबरेज फारुख शेख (वय 22) अशी अटक केलल्या आरोपींची नावं आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या