मुंबई : मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीतून मुंबई गाठलेल्या मनोज जरांगे पाटील यांचा लढा निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. जरांगे पाटील यांच्यासोबत हजारोंचा मराठा जनसमुदाय वाशीत धडकला आहे. सरकारकडून तोडगा काढण्यासाठी तब्बल 5 ते 6 अध्यादेश जरांगे पाटील यांच्याकडे देण्यात आले आहेत. त्यामुळे जरांगे पाटील आज (26 जानेवारी) दुपारी दोन वाजता भूमिका जाहीर करणार आहेत. 



सकारात्मक तोडगा निघणार?


मनोज जरांगे पाटील यांचे वादळ मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर आता सरकारकडूनही पळापळ सुरु झाली आहे. तब्बल पाच ते सहा जीआर काढून मनोज जरांगे पाटील यांच्याकडे शिष्टमंडळाच्या माध्यमातून पाठवल्याची माहिती समोर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे वाशीमध्ये सभा घेऊन समाजाला जीआरची माहिती देणार आहेत. जीआरमध्ये काय आहे याकडे आता मराठा समाजाचे लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान मागण्या मान्य झाल्यास कदाचित आंदोलनाचा शेवट वाशीमध्ये सुद्धा होऊ शकतो. मात्र मागण्या मान्यन झाल्यास मराठ्यांचे वादळ थेट आझाद मैदानामध्ये पोहोचेल यामध्ये दुमत असण्याचे कारण नाही. 


मुंबई पोलिसांकडूनही तयारी


दुसरीकडे या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडूनही जोरदार तयारी करण्यात आली आहे. जरांगे आणि मराठा आंदोलक वाशीहून मुंबईत येण्याचे ठरल्यास  मुंबई पोलिसांनी चेंबूर ते आझाद मैदानात जाणाऱ्या दोन्ही मार्गांची तयारी केली आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा आंदोलक वाशीहून चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर चेंबूरहून दोन मार्गे आझाद मैदानात जाता येते. यामध्ये एक ईस्टर्न फ्री वे आणि दुसरा चुनाभट्टी सायन सिटी मार्ग आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी या दोन्ही मार्गावर आंदोलकांना जाण्यासाठी तयारी केली आहे. मात्र ईस्टन फ्री वेनं आंदोलकांनी जावं यासाठी पोलीस विनंती करणार आहेत. आज 26 जानेवारी असल्याने सुट्टीचा दिवस आहे आणि त्यामुळे सिटी रस्त्याने वाहतूक कोंडी होऊ शकते. 


त्यामुळे 16.8 किलोमीटरचा ईस्टर्न फ्री वे हा मार्ग पूर्ण करत मराठा आंदोलक आझाद मैदानात पोहोचू शकतील. त्यामुळे पोलीस मराठा आंदोलकांना विनंती करतील, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मात्र, राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्या या वाशीतच असताना पूर्ण करतं का की त्यांना मुंबईत यायला लावतं. यावरही परिस्थिती अवलंबून आहे.


इतर महत्वाच्या बातम्या