कोल्हापूर : मला राजकारणात यायचं नाही, पण मराठा समाजाला (Maratha  आरक्षण देत नसल्यास काय करायचं? समाजाला आरक्षण द्या आम्ही राजकारणात येत नाही अशी असा पुनरुच्चार मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज कोल्हापूरमध्ये केला. कोल्हापूरमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली पार पडली. या रॅलीमध्ये बोलताना पाटील यांनी आपल्या मागण्यांचा पुन्हा एकदा पुनरुच्चार करताना मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्याची मागणी केली. आरक्षण देईपर्यंत मुलांसाठी समाजापासून उभं राहा. मी हार मानत नाही तुम्ही सुद्धा हार म्हणायची नाही. राजश्री शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं ते आरक्षण पुन्हा द्यायचं आहे असं जरांगे पाटील यांनी सांगितले. 


शेवटचा पर्याय म्हणून विधानसभेला सगळे उमेदवार पाडावे लागतील


जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज सांगलीहून कोल्हापूरमध्ये पोहोचली. पाटील यांचे कोल्हापुरात जोरदार स्वागत करण्यात आले. जरांगे पाटील यांनी दसरा चौकामध्ये शाहू महाराज यांना अभिवादन केल्यानंतर आगीत भस्मसात झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली. यानंतर त्यांचे मिरवणुकीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आगमन झाले. शिवाजी चौकामध्ये झालेल्या जाहीर सभेत पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून तसेच कोल्हापूरच्या स्थानिक मुद्यांना सुद्धा स्पर्श केला. पाटील म्हणाले की सरकारला अजूनही आम्ही गोडीने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सांगत आहोत. मात्र शेवटचा पर्याय म्हणून विधानसभेला सगळे उमेदवार पाडावे लागतील. आता विनंती करून सांगत आहे, नाहीतर नंतर सगळेच पडतील असा इशारा सुद्धा जरांगे पाटील यांनी दिला.


सत्ताधाऱ्यांसह विरोधक सुद्धा माझ्या मागे लागले


सत्ताधाऱ्यांसह विरोधक सुद्धा माझ्या मागे लागले असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. मी काय चूक केली हे कळत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना त्यांचे पक्ष वाढवायचे आहेत मला माझ्या समाजाला आरक्षण द्यायचं असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजाला आरक्षण द्या आम्ही राजकारणात येत नाहीत असेही ते म्हणाले. 


आग लागली की लावली गेली?


कोल्हापूरच्या मुद्द्यांवर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की महापुराचा फटका कोल्हापूरला बसत आहे. काल केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली. आग लागली की लावली गेली असा प्रश्न असल्याचेही ते म्हणाले. अलमट्टी धरणाच्या पाण्यामुळे शेती उद्ध्वस्त होणार असेल तर काही तरी केलं पाहिजे असेही त्यांनी सांगितले. आरक्षणाच्या प्रश्न मिटला की पिकं उद्ध्वस्त होत आहेत त्याकडे बघू असेही सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या