जालना: देशात आरक्षणासाठी ५० टक्क्यांची मर्यादा असल्याने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा वापर केल्याचे वक्तव्य मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केले. गावातील एखाद्या नदीला बारमाही पाणी असेल आणि शेतकऱ्यांना जाण्यासाठी वाट नसेल तेव्हा पर्यायी मार्ग काढावा लागतो. त्यानुसार राज्य मागासवर्ग आयोगाच्या आधारे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण (Maratha Reservation) मिळेल. तर कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांनाही आरक्षण मिळतच आहे. तसेच ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी नाहीत त्यांना सगेसोयरे या निकषाचा वापर करत कुणबी आरक्षणाचा (Kunbi Reservation) लाभ मिळणार आहे. त्यामुळे मराठा समाजाचा तिहेरी लाभ होणार आहे. ज्यांना कुणबी म्हणून आरक्षण नको त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या स्वतंत्र आरक्षणाचा लाभ घ्यावा, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. ते शुक्रवारी अंतरवाली सराटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.


यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आणि त्यांनी मांडलेल्या आरक्षणाच्या प्रस्तावाचे स्वागत केले. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले जात असले तरी कुणबी नोंदी असलेल्यांना सगेसोयरे निकषातंर्गत आरक्षण मिळत राहावे, ही आमची मागणी काय आहे, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्षात ठेवावे. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना सगेसोयरेचा निकष लागू करावा, ही अधिसूचना लक्षात ठेवावी. त्याशिवाय आमचं आंदोलन थांबणार नाही, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.


गोरगरीब मराठ्यांमुळेच ९६ कुळींनाही आरक्षण मिळाले: जरांगे


राज्य मागासवर्ग आयोगाने कुणबी नोंद नसलेल्या मराठा बांधवांना स्वतंत्र आरक्षण दिले आहे. ज्यांना कुणबी आरक्षण नको, त्यांनी हे स्वतंत्र आरक्षण घ्यावे. त्यासाठीच राज्य मागासवर्गाचा अहवाल आला आहे. पण या आरक्षणासाठीही राज्यातील गोरगरीब मराठाच लढले, ही बाब लक्षात ठेवावी, याकडे जरांगे-पाटील यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आता तिन्ही बाजूंनी मराठा समाजाचा फायदा होणार आहे. सगळे मराठा हे मुळात शेतकरी असल्याने कुणबीच आहेत. तरीही कुणबी आरक्षण नको असलेल्या मराठा बांधवांसाठी वेगळी सोय झाली आहे. ९६ कुळी, ९२ कुळी हा विषयच नाही. कोणताही मराठा हा कच्चा नाही. सगळ्याच मराठ्यांच्या मनगटात जोर आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.


आणखी वाचा


तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाहीच, 20 तारखेआधी निर्णय घ्या ; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा