मुंबई/नांदेड : हिंगोलीतून आपल्या शांतता रॅलीला सुरुवात केलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी आज परभणीतून मराठा समाजाला संबोधित केले. परभणीत जरांगे यांच्या रॅलीला उदंड प्रतिसाद मिळाला असून उद्या नांदेडमध्ये जरांगे यांची शांतता रॅली आणि जाहीर सभा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये (Nanded) सकल मराठा समाजाकडून सर्वोतोपरी तयारी करण्यात आली आहे. दुसरीकडे नांदेड शहरातील शाळांना सुट्टी (School) देण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी काढले आहेत. त्यावरुन, आता वाद निर्माण झाला असून अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या निर्णयाला आक्षेप घेतला आहे.
मनोज जरांगे यांची उद्या नांदेडमध्ये जनजागृती यात्रा दुपारी 12 वाजता दाखल होणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून नांदेड जिल्ह्यातील आजू बाजूच्या गावातील नागरिक उद्या नांदेड शहरात जरांगेंच्या सभेसाठी येणार आहेत. या रॅलीमुळे रस्त्याच्या वाहतुकीतही बदल करण्यात आला आहे. तर, नांदेडमधील शाळाना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांच्या आदेशान्वये ही सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे पत्र सर्व शाळेच्या प्राचार्य व मुख्याध्यापकांना पाठवण्यात आलं आहे.
पोलीस अधीक्षक, नांदेड यांची अधिसूचना क्रमांक 6319 दिनांक 06 जुलै 2024 वरील संदर्भीय विषयांन्वये नांदेड शहरातील सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक यांना सुचित करण्यात येते की, दिनांक 08 जुलै 2024 रोजी नांदेड शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने व गर्दी होणार आहे. त्यामुळे नांदेड शहरातील सर्व रस्ते उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 06 पर्यंत बंद आहेत, अशी अधिसूचना संदर्भ (2) अन्वये पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी दिली आहे. सदर अधिसूचनेच्या पार्श्वभूमीवर मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांनी दिलेल्या निर्देशानुसार नांदेड शहरातील सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांना दिनांक 08 जुलै 2024 रोज सोमवार एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. तसेच याद्वारे कळविण्यात येते की, दिनांक 08 जुलै 2024 सुट्टीच्या दिवशीच्या तासिका पाठ्यक्रम पुढील येणाऱ्या लगतच्या दोन अर्धवेळ कार्यदिनाच्या दिवशी पूर्णवेळ शाळा घेऊन सदर सुट्टीच्या दिवशीच्या तासिका पाठ्यक्रम पूर्ण करून घ्यावा.सदर सुट्टी ही केवळ नांदेड शहरातील शाळांनाच लागू आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी, अशा आशयाचं पत्र शिक्षणाधिकारी यांनी दिलं आहे.
दरम्यान, आता शिक्षणाधिकाऱ्यांच्या या पत्रावरुन वाद निर्माण झाला असून अॅड.गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेप घेत तक्रार केली आहे.
गुणरत्न सदावर्तेंची तक्रार
मनोज जरांगे हे नांदेड येथे 8 जुलै 2024 रोजी रॅली काढत असून सकल मराठा समाजाच्यावतीने शिक्षण संस्था बंद ठेवण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी पारित केले आहेत. त्याविरोधात एडिशनशिप चीफ सेक्रेटरी शिक्षण विभाग, त्याचबरोबर विधानसभेच्या सभापती महोदयांना विनंती केलेली आहे, की तातडीने शैक्षणिक अधिकार हा संविधानिक आहे. अशा प्रकारचे शाळा बंद ठेवणे हे चुकीचे आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि रॅली जर शिक्षणाला बाधक ठरत असेल तर ती रॅली थांबवण्यात यावी, असे निवेदन अॅड.गुणरत्न सदावर्ते यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत शाळांना सुट्टी
कोकणात अतिवृष्टी होत असल्याने सिंधुदुर्ग आणी रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टीची घोषणा करण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत घोषणा केली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना याचे आदेश देण्यात आले आहेत. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आल्याने दोन्ही जिल्ह्यात उद्या शाळा बंद राहणार आहेत.