Manohar Joshi Passed Away: बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक , महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन निधन झालं. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मध्यरात्री 3 वाजता मुंबईच्या (Mumbai) हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोहर जोशींच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी आपले सर्व नियोजित दौरे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे बुलढाणा दौऱ्यावर होते. मनोहर जोशींच्या निधनाची बातमी समजताच त्यांनी आपला नियोजित दौरा रद्द केला. ते मुंबईकडे रवाना होणार आहेत.
मनोहर जोशी यांचे पार्थिव हिंदूजा रुग्णालयातून सकाळी नऊ वाजता माटुंगा येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार आहे. सकाळी 11 ते 2 या दरम्यान अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे.
उद्दव ठाकरेंचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द -
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पूर्व नियोजीत दौऱ्यामुळे सध्या शेगाव तालुक्यात आहेत. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दिलेल्या माहीतीनुसार उद्धव ठाकरे यांचे आजचे बुलढाणा जिल्हा दौऱ्याचे सर्व नियोजीत कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील आजच्या नियोजित तीन सभा रद्द करण्यात आल्या आहेत. उद्धव ठाकरे शेगाव वरुन संभाजीनगर विमानतळ आणि तिथून मुंबईला येतील. त्यानंतर ते मनोहर जोशी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतील, अशी माहिती मिळाली आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, लोकसभेचे माजी अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी मनोहर जोशी सर यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जोशी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली, असे ट्वीट मिलिंद नार्वेकर यांनी केले आहे.
मनोहर जोशींची कारकीर्द
प्रकृती अस्वास्थामुळे मनोहर जोशी गेल्या बऱ्याच काळापासून सक्रीय राजकारणापासून दूर होते. त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 ला रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला. 1995 साली ते युतीच्या सत्तेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. बालपण-ध्येयाकडे खडतर सुरुवात सुसंस्कृत पण गरिब कुटुंबात जन्म झाल्यामुळे 'कमवा आणि शिका' या तंत्रानं लहानपणापासूनच संघर्ष त्यांच्या नशीबी होता. वडिलांबरोबर भिक्षुकी करून पैसे मिळवू लागले.