मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातमधून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील काही उपक्रम राबवणाऱ्या लोकांचं कौतुक केलं. त्यांनी यात महाराष्ट्रातील एका शेतकरी उत्पादक कंपनीचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, मित्रांनो शेती क्षेत्रात, नव्या शक्यता निर्माण होत आहेत. अशातच महाराष्ट्रातील एका घटनेकडे माझे लक्ष गेले. तिथे एका शेतकरी उत्पादक उद्योग कंपनीने मका शेतकऱ्यांकडून मका खरेदी केला. कंपनीने शेतकऱ्यांना मालाच्या  किमती शिवाय, वेगळा बोनस देखील दिला, असं मोदी म्हणाले.


पंतप्रधान मोदी म्हणाले की, शेतकऱ्यांना सुखद आश्चर्य वाटले. जेव्हा त्यांनी कंपनीला विचारले तेव्हा कंपनीने सांगितले की भारत सरकारच्या नव्या शेती नियमानुसार, शेतकरी  भारतात कुठेही आपले उत्पादन विकू शकतो आणि त्याची त्यांना चांगली किंमत मिळते आहे. म्हणून त्यांनी असा विचार केला की हा जास्तीचा मिळालेला नफा, शेतकऱ्यांसोबत वाटून घ्यायला हवा. त्या नफ्यावर शेतकऱ्यांचा देखील हक्क आहे. आणि म्हणून त्यांनी शेतकऱ्यांना बोनस दिला आहे, असं म्हणत मोदींनी कौतुक केलं.


पुढच्या काही दिवसात अनेक उत्सव, आपल्याला संयमानंच वागावं लागणार : पंतप्रधान मोदी


पुढच्या काही दिवसात अनेक उत्सव येणार आहेत. ईद आहे, कोजागिरी पौर्णिमा आहे, वाल्मिकी जयंती आहे, मग, धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज, छट पूजा, गुरू नानक देवजी जयंती आहे. कोरोनाच्या या संकटकाळात, आम्हाला संयमानंच वागावं लागणार आहे, मर्यादेतच रहावं लागणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आमच्या वीर जवानांना हे सांगू इच्छितो की, भलेही आपण सीमेवर तैनात आहात, परंतु पूर्ण देश आपल्याबरोबर आहे, आपल्यासाठी प्रार्थना करत आहे.  ज्यांचे पुत्र आणि कन्या आज सीमांवर तैनात आहेत, त्या कुटुंबाच्या त्यागाला मी नमन करतो, असं ते म्हणाले.


देशाला विजयादशमीच्या शुभेच्छा देताना मोदी म्हणाले की, माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज विजयादशमी म्हणजे दसऱ्याचा  उत्सव आहे. या पवित्र प्रसंगी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दसऱ्याचा  हा उत्सव, असत्यावर सत्याच्या विजयाचा उत्सव आहे. मोदी म्हणाले की, दिल्लीच्या कॅनॉट प्लेसवर असलेल्या एका खादीच्या दुकानात यावेळी गांधी जयंतीच्या दिवशी एकाच दिवसात एक कोटी रूपयांपेक्षा अधिक खादीची खरेदी झाली.कोरोनाच्या काळातही खादीचे मास्क अत्यंत लोकप्रिय होत आहेत, असं ते म्हणाले.


अमेरिकेतील चिन्मय आणि प्रज्ञा पाटणकरांचं कौतुक
यावेळी पंतप्रधानांनी अमेरिकेतील चिन्मय आणि प्रज्ञा पाटणकरांचं कौतुक केलं. ते म्हणाले की, आजकाल, मल्लखांबसुद्घा, अनेक देशांमध्ये प्रचलित होत आहे. अमेरिकेत चिन्मय आणि प्रज्ञा पाटणकर यांनी आपल्या घरातच मल्लखांब शिकवायला सुरूवात केली, तेव्हा, त्यांना याला इतकं यश मिळेल, याचा अंदाजही नव्हता. अमेरिकेत आज, अनेक ठिकाणी, मल्लखांब प्रशिक्षण केंद्रं चालत आहेत, असं ते म्हणाले.


मोदी म्हणाले की, 'न हि ज्ञानेन सदृष्यं पवित्र मिह विद्यते' अर्थात, ज्ञानासारखं, जगात काहीच पवित्र नाही.  ज्ञानाचा प्रसार करणारे, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या सर्व महोदयांचं मी, मनापासून अभिनंदन करतो, असं ते म्हणाले.


पंतप्रधान मोदी म्हणाले की, बापूजींनी सरदार पटेल यांच्या विषयी म्हटलं होतं की त्यांच्या विनोदी गप्पा गोष्टी मला एवढ्या हसवतात की हसून हसून माझे  पोट दुखायला लागते.  याच्यात आपल्यासाठी  शिकवण आहे की कितीही वाईट परिस्थिती असेल तरीही आपली विनोदबुद्धी जागृत ठेवायला हवी, असं पंतप्रधान म्हणाले.


पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्हाला नेहमीच आपल्या सर्जनशीलतेने, प्रेमाने, प्रत्येक क्षणी,  प्रयत्नपूर्वक, एक भारत श्रेष्ठ भारत, हे तत्व  सुंदर रंगात साकार करायचे  आहे.  काश्मीर खोरे, संपूर्ण देशभरातील, ~90 टक्के पेन्सिल स्लेट, लाकडी पट्टीची मागणी पुरी करते आणि त्यात देखील खूप मोठा भाग पुलवामा चा आहे. एक काळ असा होता की जेव्हा आपण विदेशातून पेन्सिली साठी लाकूड मागवत होतो. पण आता आमचा पुलवामा, देशाला आत्मनिर्भर बनवतो आहे, असं ते म्हणाले.


2014 पासून सतत करत आहेत मन की बात
पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात केली होती. ऑक्टोबर 2014 मध्ये मोदींनी मन की बातची सुरुवात केली होती. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार मन की बातद्वारे संवाद साधत असतात. आज 70 वी मन की बात होती.