Mangal Prabhat Lodha Profile : शिंदे - फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) नुकताच पार पडला आहे. या मंत्रिमंडळात शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी नऊ अशा एकूण 18 मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. याच मंत्रिमंडळात मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मंगलप्रभात लोढा यांना मानाचं स्थान मिळालं आहे. मंगलप्रभात लोढा हे मुंबई भाजपचा मोठा चेहरा आहेत. त्यांची वकीली सोडून बांधकाम व्यावसायिक आणि त्यानंतर राजकारणी अशी कारकिर्द आणि त्यांच्याविषयीची अधिक माहिती जाणून घ्या.
मंगलप्रभात लोढा यांचा जीवनपरिचय
- मंगलप्रभात लोढा यांचा जन्म 01 डिसेंबर 1955 साली जोधपूर येथे जैन कुटुंबात झाला.
- त्यांचे वडील गुमाल माल लोढा स्वातंत्र्यसैनिक आणि न्यायाधीश होते, तर आई मंजू लोढा गृहिणी होती.
- मंगलप्रभात लोढा यांनी बी.कॉमचं शिक्षण पूर्ण करून LLB पदवी प्रात्प केली. त्यानंतर ते जोधपूरमध्ये वकील म्हणून कार्यरत होते.
- वडिल उच्च न्यायाधीश असलेल्या ठिकाणी वकीली करणं योग्य वाटलं नाही म्हणून लोढा मुंबईकडे वळले.
- लोढा यांनी मुंबईत वकीली ऐवजी रिअल इस्टेट फर्ममध्ये नोकरी केली. त्यानंतर त्यांच्या मित्राच्या खरेदी विक्रीच्या व्यवसायात जोडले गेले. त्यांनी 1982 साली रिअल इस्टेट व्यवसायात जम बसवला.
- 1990 साली ते राजकारणाकडे वळाले. त्यांचं संघासोबत लहानपणापासूनच नातं होतं.
- लालकृष्ण अडवाणी यांच्या 1990 सालीच्या रथयात्रेने ते प्रभावित झाले. त्यानंतर त्यांनी 1993 साली भाजपमधून काम करण्यास सुरुवात केली.
- 1995 मध्ये मंगलप्रभात लोढा यांना पहिल्यांदा मुंबईतील मलबारहिलमधून उमेदवारी मिळाली. काँग्रेसचे बी.एस.देसाई यांचं प्रभुत्व असलेल्या मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
- त्यानंतर भाजपमध्ये मंगलप्रभात लोढा यांची ताकद वाढली.
- सध्या देशातील प्रसिद्ध आणि श्रीमंत व्यावसायिकांमध्ये मंगलप्रभात लोढा यांचं नाव आहे.
शिंदे-फडणवीस सरकारमधील 18 मंत्री
भाजपकडून पहिली शपथ काँग्रेसमधून भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा या क्रमाने 18 आमदार शपथबद्ध झाले. या शपथविधी सोहळ्याला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्राचे प्रतिनिधी म्हणून भाजपचे राष्ट्रीय महसचिव विनोद तावडे उपस्थित होते.