Maharashtra Cabinet Expansion : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये महसूल मंत्री राहिलेल्या चंद्रकांत पाटील यांचा राजकीय क्षेत्रामधील प्रवास 2004 पासून सुरु झाला असला, तरी त्यांनी सलग 13 वर्षे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे भाजपचे एकनिष्ठ आणि मराठा चेहरा म्हणून पाहिले जाते. गिरणी कामगाराचा मुलगा ते दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री असा त्यांचा आजवर झालेला प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांनी आज फुटीर एकनाथ शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

  



चंद्रकांत पाटील यांचा जन्म 11 जून 1959 रोजी एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. मुंबईतील गिरणगावात त्यांचे बालपण गेले. वयाच्या 18व्या वर्षापासूनच देशसेवेचे व्रत त्यांनी अंगीकारले. गिरणी कामगाराचा मुलगा ते राज्यातील सर्वात मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हीच मजल त्यांच्या दुरदृष्टीचे आणि समाजाप्रती त्यांनी दिलेल्या योगदानाचे दर्शन घडवते.


 
चंद्रकांत पाटील यांचे वडील बच्चू पाटील आणि आई गिरणी कामगार होते. त्यांचे वडील बच्चू पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील गारगोटीनजीक असलेल्या खानापूर येथील आहेत. आई वडील गिरणी कामगार असल्याने चंद्रकांत पाटील यांचा जन्म प्रभूदास चाळ, रे रोड, मुंबई या ठिकाणी झाला. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईमध्येच झाले. शालेय शिक्षण त्यांचे राजा शिवाजी विद्यालयातून झाले, तर सिद्धार्थ महाविद्यालयातून त्यांनी बी.कॉमची पदवी प्राप्त केली.



विद्यार्थी दशेतून चंद्रकांत पाटील सामाजिक जीवनात



चंद्रकांत पाटील यांना 1980 च्या अभाविपमध्ये सक्रिय असतानाच त्यांना यशवंतराव केळकर यांचे मार्गदर्शन लाभले. उत्तम संघटन कौशल्य आणि समर्पित भावनेमुळे अभाविपमध्ये त्यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. भाजकडून संघटनात्मक कार्याची जबाबदारी मिळाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये अभाविप मजबूत करण्यात मोलाचे योगदान दिले.



अभाविपमधून संघात सक्रिय



अभाविपमध्ये प्रचारक म्हणून काम थांबवल्यानंतर चंद्रकातंदादा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय झाले. सन 1995-1999 या कालावधीत त्यांच्याकडे संघाच्या पश्चिम महाराष्ट्राचे सहकार्यवाह म्हणून जबाबदारी होती. 1999 पासून ते 2004 पर्यंत त्यांच्यावर पश्चिम महाराष्ट्रात संघाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात त्यांचा मोलाचा सहभाग होता. सलग 13 वर्ष संघाचे प्रचारक राहिलेल्या चंद्रकात पाटील यांच्याकडे 1994 ते 2000 पर्यंत रामभाऊ म्हाळगी प्रबोधनात विश्वस्त मंडळात सदस्य होते, तर एप्रिल 2000 पासून ते 2013 पर्यंत ते सचिवही राहिले.



2004 पासून राजकारणात सहभाग



अभाविपमध्ये सलग 13 वर्ष प्रचारक म्हणून काम केल्यानंतर संघामध्येही पश्चिम महाराष्ट्रची सहकार्यवाह म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडल्यानंतर त्यांची 2004 मध्ये राजकारणात एन्ट्री केली. मातृशाखा संघामध्ये केलेल्या कामाने भाजपमध्ये त्यांचा दरारा वाढत गेला. त्यामुळे सक्रीय राजकारणात उतरल्यानंतर 2004-2007 या कालावधीत त्यांच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आणि दक्षिण महाराष्ट्र विभाग प्रमुख अशी जबाबदारी सोपविण्यात आली.



राजकारणात प्रवेश केल्यानंतर चार वर्षांमध्ये आमदारकी

पश्चिम महाराष्ट्रात केलेल्या कामाचा ठसा तसेच पक्षपातळीवरील प्रवेशानंतर चार वर्ष केलेल्या कामाची पोचपावती चंद्रकांत पाटील यांना 2008 मध्ये मिळाली. भाजपकडून त्यांना पुणे शिक्षक पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेवर जाण्याची संधी मिळाली. त्यांच्या कामाची पोचपावती पक्षाने देत 2014 मध्येही याच मतदारसंघातून दुसऱ्यांदा नेतृत्व करण्याची संधी दिली.



2014 मध्ये राज्यात सत्तांतर आणि चंद्रकांत पाटील दुसऱ्या क्रमांकाचे नेते झाले



राज्यात 2014 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर भाजप शिवसेनेची निवडणुकीनंतर युती झाली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले. या मंत्रिमंडळात चंद्रकांत पाटील यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला.



मंत्रिमंडळातील समावेशानंतर सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग, सार्वजनिक बांधकाम विभागासारख्या महत्त्वाच्या खात्यांचा पदभार चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला. सार्वजानिक बांधकाम विभाग वगळून इतर दोन विभागांची जबाबदारी दादांनी ऑक्टोबर 2016 पर्यंत समर्थपणे सांभाळली. यानंतर त्यांच्याकडे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली. 2014 ते 2019 पर्यंत त्यांनी महाराष्ट्रातील हे महत्त्वाचे कॅबिनेट मंत्रिपद यशस्वीरीत्या सांभाळले.


चंद्रकांतदादा 2019 मध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष



जुलै 2019 मध्ये चंद्रकांत पाटलांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. देवेंद्र फडणवीस ब्राह्मण असल्याने भाजपने जाय समतोल साधण्यासाठी मराठा चेहरा म्हणून चंद्रकांत पाटील यांना संधी दिली. त्यांच्याच नेतृत्वात 2019 मध्ये भाजपने निवडणूक लढवली. या निवडणुकीत भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला. मात्र, भाजप व शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपदावरून वाद झाल्याने भाजपला सर्वांत मोठा पक्ष असूनही विरोधी बाकावर बसावे लागले.