चंद्रपूर : प्रेमसाई बाबांच्या नादात केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी 'वाघ बचाव' आणि 'मुनगंटीवार हटाव' अशी गरळ ओकल्याचा दावा खुद्द वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'एबीपी माझा'च्या चर्चेत केला. मनेका गांधी यांच्या श्रद्धास्थानी असलेले हे बाबा आहेत तरी कोण? अशी चर्चा रंगली आहे.
मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातले प्रेमसाई हे मॅट्रिक पास आहेत. आसामच्या कामाख्या मंदिरात एका महंताच्या सेवेत ते होते. त्यावेळी मनेका गांधी या बाबांच्या भक्त झाल्या.
मनेका गांधी 12 ऑगस्ट रोजी यवतमाळच्या प्रेमसाईंच्या आश्रमात आल्या. त्यानंतर 15 ऑगस्टला त्यांचे पुत्र खासदार वरुण गांधीही आश्रमात आले. त्यामुळे प्रेमसाईंचा भाव यवतमाळच्या धार्मिक वर्तुळात एकदम वधारला. अभिनेत्री सुधा चंद्रन यांना बोलावून बाभुळगाव तालुक्यात मोठा कार्यक्रम घेण्यात आला होता.
प्रेमसाईबाबा यांना राजकारणात येण्याची इच्छा असल्याचा दावा केला जात आहे. त्यासाठी मनेका गांधी यांच्या राजकीय पार्श्वभूमीचाही ते वापर करण्याची शक्यता आहे. मूळचे चंद्रपूरचे असल्याने प्रेमसाई यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठीच मनेका गांधी यांनी वाघिणीच्या खांद्यावर बंदूक ठेवत मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधल्याचं बोललं जात आहे. स्थानिक भाजप नेते तर या बाबांवर तडकून बोलतात.
तो गुन्हेगार आहे. त्याला भाजपचे चार नेतेही माहीत नाहीत. आपण दिल्लीत तक्रार केल्यानंतर उलट आम्हालाच झापलं, असा दावा भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी केला. अर्थात यात प्रेमसाई यांची बाजू अजूनही समोर आलेली नाही. पण प्राणीप्रेमाच्या आडून थेट वनमंत्र्यांचीच शिकार करण्याचा मनेका गांधी यांचा डाव असेल, तर तो गंभीर आहे.
प्रेमसाई बाबांच्या नादाने मनेका गांधींचं 'वाघ बचाव, मुनगंटीवार हटाव'?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Nov 2018 07:33 PM (IST)
मूळचे चंद्रपूरचे असल्याने प्रेमसाई बाबा यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठीच मनेका गांधी यांनी वाघिणीच्या खांद्यावर बंदूक ठेवत मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधल्याचं बोललं जात आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -