पुणे : 'दृश्यम' सिनेमा पाहून सख्ख्या चुलत भावाचा खून केल्याची घटना पुण्यात घडली आहे. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. मात्र अजूनही मृतदेह पोलिसांना सापडलेला नाही.
पैशांच्या वादातून हत्या
पैशांच्या वादातून ही हत्या घडल्याचं उघड झालं आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी मिलिंद आलसपुरेने आरोपी कपिल आलरपुरेला 10 लाख रुपये दिले होते. त्या पैशांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मिलिंद नांदेडहून पुण्याला आले. पैसे परत मिळावे म्हणून मिलिंद यांनी कपिलच्या मागे तगादा लावला होता. त्यामुळे कपिलने मिलिंद यांचा काटा काढण्याचं ठरवलं.
आरोपी कपिलने मिलिंद आलसपुरे यांना फुरसुंगीच्या कॅनॉलजवळ नेलं आणि डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली.
असा कट रचला!
गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून आरोपीने मिलिंद यांच्या नावाने बसचं तिकीट काढलं. मात्र कपिल यांच्या जागेवर राम नावाच्या व्यक्तीला प्रवास करायला सांगून त्याला कोंढापुरी इथे उतरण्यास सांगितलं.
मिलिंद यांची बॅग आणि मोबाईल यावेळी बसमध्येच ठेवण्यात आले होते. नंतर मिलिंद कोंढापुरी येथून बेपत्ता झाल्याचा बनाव करण्यात आला. त्यानंतर कपिलने दिपक बोराच्या मदतीने मिलिंद यांचा मृतदेह नष्ट करण्याच्या उद्देशाने फुरसुंगीच्या कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात फेकून दिला.
मिलिंद बेपत्ता झाल्याचा बनाव रचण्यात आरोपी यशस्वी ठरले. मात्र पोलिसांनी तपास सुरु केला असता त्यांना कपिलवर संशय आला. पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवताच कपिल आणि त्याच्या साथीदारांनी हत्येची कबुली दिली.
मृतदेह अद्यापही सापडलेला नाही!
गुन्ह्याचा उलगडा झाला असला तरी मिलिंद आलासपुरे यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. दरम्यान मिलिंदच्या हत्येप्रकरणी कपिल आलासपुरे, दीपक बोरा आणि राम चोरघडे या तिघांना अटक करण्यात आली आहे.
'दृश्यम' सिनेमातल्या सस्पेन्सने शेवटच्या सीनपर्यंत प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवलं. हत्या लपवण्यासाठी अजय देवगण अफलातून शक्कल लढवतो आणि त्या गुन्ह्याचा पर्दाफाश करण्यात पोलिस अपयशी ठरतात, असं या चित्रपटाचं कथानक. पण चित्रपटातील अजय देवगणची आयडिया कपिल आलसपुरेला मात्र वाचवू शकली नाही.