Pune Accident News : पुण्यात (Pune Accident News) अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. चांदणी चौकातील अपघाताची घटना ताजी असतानाच पुणे स्टेशन परिसरात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. भरधाव वाहनाच्या धडकेने (Accident) पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विलास गावडे असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. या मृत्यू  (Death) झालेल्या व्यक्तीची संपूर्ण माहिती कळू शकली नाही आहे. मात्र या घटनेने पुणे स्टेशन परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.


विशाल  गावडे अलंकार चित्रपटगृह परिसरातून निघाले होते. त्या वेळी भरधाव गाडीने गावडे यांना धडक दिली. यात गावडे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुणे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहेत आणि पसार झालेल्या वाहनचालकाचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनीच तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार तपास सुरु आहे.


वाहनांना वेग जीवघेणा...
पुण्यात 13 मार्चला असाच अपघात झाला होता. त्या अपघातात आपल्या लाडक्या लेकीला पोलीस व्हायचं स्वप्न असल्याने तिला पोलीस भरतीसाठी पुण्यामध्ये घेऊन आलेल्या एका वडिलांचा जागीच मृत्यू झाला होता. सुरेश सखाराम गवळी (वय 55) असे मृत्यू झालेल्या वडिलांचं नाव होतं. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात होती. दोघेही नाशिकमध्ये राहत होते. अचानक समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने सुरेश गवळी यांना उडवलं आणि यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.  


अपघाताचं सत्र थांबेना
पुणे जिल्ह्यात अपघाताच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. रोज अपघाताच्या घटना समोर येत आहेत. त्यात अनेकांचे नाहक जीव जात आहेत. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी भोर परिसरात एका बसने पेट घेतला होता. थोड्या प्रमाणात या आगीची चाहूल लागताच चालकाने सर्व प्रवाशांना बाहेर काढलं होतं. त्यानंतर बसमध्ये अचानक भडका उडाला होता. या चालकांच्या प्रसंगावधानामुळे आतापर्यंत अनेकांचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे सगळ्यांकडून चालकांचं कौतुक करण्यात येतं. मात्र अपघात कधी थांबतील आणि नागरिक सुरक्षित प्रवास कधी करु शकतील , असा प्रश्न अनुत्तरीतच आहे.