नववर्षाच्या स्वागतासाठी घनदाट जंगलात उंचच उंच पाळणे, वेगवेगळ्या खाद्य पदार्थांची रेलचेल असलेली दुकाने, सजून धजून आलेले गावकरी आणि झाडांच्या रुपात असलेल्या मामा-भाच्याच्या मूर्तीची होणारी पूजा ही "वृक्ष वल्ली आम्हा सोयरे" ह्या ओळींना सार्थक ठरवणारी आहेत. मामा-भाच्याच्या नात्यावर एखादे मंदिर असणे ही आश्चर्यकारक गोष्ट वाटते. मात्र, इथे ते मंदिरही आहे आणि गावकरी मोठ्या श्रद्धेने ह्याची पूजा देखील करतात. सडक अर्जुनी तालुक्यातील गिरोला (हेटी )गावाच्या घनदाट जंगल परिसरात हे मंदिर स्थित आहे. दरवर्षी नववर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच एक व दोन जानेवारीला ही मामा-भाच्यांची यात्रा भरते.
भाविक मोठ्या श्रद्धेने तेंदूच्या झाडाखाली स्थित असलेल्या ह्या मूर्तींची पूजा करतात. ह्यातील मोठे झाड हे मामाचे आहे, तर लहान झाड भाच्याचे आहे. भाविक आपला नवस देखील इथे बोलतात. यात्रेच्या सुरुवातीला एक अखंड ज्योती प्रज्वलित केली जाते. ह्या जोतीचे विसर्जन करुन यात्रेची दुसऱ्या दिवशी सांगता केली जाते. गोंदिया तसेच भंडारा जिल्ह्यातील भाविक दरवर्षी ह्या जंगलातील मंदिराला भेट देतात. एक प्रकारे झाडांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी ही यात्रा असते.
यात्रेची अख्यायिका -
जवळ जवळ 110 वर्षांपूर्वी मामा-भाचा जंगलात झाडे तोडायला गेले होते. त्यांनी ज्या झाडाला तोडण्याचा प्रयत्न केला, त्या झाडातून रक्त निघाले, शिवाय मामा-भाच्याला दुखापत देखील झाली. त्यामुळे ते त्या झाडांची पूजा करू लागले. कालांतराने ह्याची चर्चा गावात पसरली आणि गावकरी देखील ह्या झाडांची पूजा करू लागली. मामा-भाच्याच्या मृत्यूनंतर ह्या दोन झाडांच्या खाली गावकऱ्यांनी मंदिराची उभारणी केली, अशी अख्यायिका आहे. गेल्या काही वर्षांपासून या ठिकांनी यात्रा भरते. भाविक आपले नववर्ष जंगलाच्या सानिध्यात साजरे करतात. या ठिकाणी झाडांची कुठलीही कत्तल होत नाही. शिवाय त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी देखील गावकरी घेतात. गिरोला वनक्षेत्र पुढे नागझीराच्या अभयारण्याला लागते.
मामा-भाचा मंदिर जरी घनदाट जंगलात वसले असले तरी आज या ठिकाणी दळणवळणा करिता रस्ता तयार झाला आहे. यात्रेच्या निमीत्ताने हजारो भाविक या जंगलातील मंदिराचे दर्शन घेऊन जातात. तुकारामांनी आपल्या अभंगातून वृक्षांच्या संवर्धनाचा संदेश दिला आहे. या यात्रेच्या निमीत्ताने का होईना ग्रामस्थ वर्षाचा पहिला दिवस झाडांच्या सानिध्यात घालवतात. शिवाय झाडांबद्दल आपुलकी व्यक्त करतात. या ग्रामस्थांप्रमाणेच आपण देखील आपला निसर्ग अबाधित ठेवण्याचा निर्धार या नववर्षात करण्याची गरज आहे हे नक्की.
हेही वाचा - महाविकासआघाडीचा भाजपला दणका; नाशिक जिल्हापरिषदेवर भगवा, तर कोल्हापुरात सत्तांतर
Bharadidevi Yatra | आंगणेवाडीच्या भराडीदेवीची यात्रा 17 फेब्रुवारी रोजी, यात्रेला जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग | ABP Majha