महाविकासआघाडीचा भाजपला दणका; नाशिक जिल्हापरिषदेवर भगवा, तर कोल्हापुरात सत्तांतर
एबीपी माझा वेब टीम | 02 Jan 2020 03:41 PM (IST)
महाविकासआघाडी आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही आघाडी करताना दिसत आहे. या आघाडीमुळे नाशिक जिल्हापरिषदेवर भगवा फडकला आहे. तर कोल्हापुरातही सत्तांतर पाहायला मिळाले.
कोल्हापूर/नाशिक : भाजपला महाविकास आघाडी फॉर्म्युलाचा फटका आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही बसला आहे. नाशिक पाठोपाठ आता कोल्हापुरातही जिल्हा परिषदेवरुन भाजपची सत्ता खालसा झाली आहे. महाविकास आघाडीमुळे भाजपला सत्तेपासून दूर राहवं लागलं आहे. भाजपच्या अरुण इंगवले यांचा पराभव झाला असून काँग्रेसचे बजरंग पाटील कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नवे अध्यक्ष झाले आहेत. तर, नाशिक जिल्हापरिषदेवर भगवा फडकल असून आघाडीच्या पाठिंब्यानं सेनेच्या बाळासाहेब क्षीरसागरांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रावादी यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीने भाजपला राज्यातील सत्तेपासून दूर ठेवले. याचीच पुनरावृत्ती आता ही आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही करताना दिसून येत आहे. यामुळे राज्यातील आघाडी आता स्थानिक स्थरावरही होताना दिसून येत आहे. नाशिक जिल्हा परिषदेवर पुन्हा भगवा - नाशिक जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला असून महाविकास आघाडीचा प्रयोग नाशकात यशस्वी झालेला बघायला मिळालाय. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने निफाड तालुक्यातील उगाव गटाचे सदस्य शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर हे बिनविरोध विजयी झाले आहेत. चांदवड तालुक्यातील दुगाव गटाच्या राष्ट्रवादीच्या सयाजी गायकवाड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. 73 पैकी 52 जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला आहे, बहुमतासाठी 37 ही मॅजीक फिगर होती. नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील आरक्षित असल्याने चांगलीच स्पर्धा रंगली होती. मात्र, भाजपकडे फक्त 15 एवढेच संख्याबळ असल्याने भाजपला संधी मिळणार नसल्याचं स्पष्ट असल्याने त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली होती. जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली होती. सकाळी 11 ते एक वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. तर एक ते सव्वाएक या 15 मिनिटांच्या काळात अर्ज छाननी पार पडली. सव्वाएक ते पावणेदोन दरम्यान माघारीसाठी वेळ देण्यात आला होता. यातच महाआघाडीने बाजी मारली आणि शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर हे बिनविरोध विजयी झाले. असे होते संख्याबळ - एकूण 73 - शिवसेना 25 भाजप 15 राष्ट्रवाडी 15 काँग्रेस 8 अपक्ष 6 माकप 3 रिक्त 1 कोल्हापुरात सत्तांतर - अखेर कोल्हापूर जिल्हा परिषदेची भाजपची सत्ता खालसा झाली. महाविकास आघाडीने एकत्र येऊन हे सत्तांतर केले. काँग्रेसचे बजरंग पाटील हे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नवे अध्यक्ष झाले आहेत. तर, भाजपचे अरुण इंगवले यांचा त्यांनी पराभव केला. बजरंग पाटील यांना 41 मतं, तर अरुण इंगवले याना 24 मतं मिळाली. तर, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांना 41 तर राहुल आवाडे यांना 24 मतं मिळाली. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. यात सतेज पाटील यांची भूमिका महत्वाची मानली जात आहे. यामुळे चंद्रकांत पाटील यांना लोकसभा निवडणुकीपासून सलग तिसरा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. हेही वाचा - सूर्यग्रहण काळात पाणी न सोडण्याचा निर्णय त्र्यंबक नगरपरिषदेच्या अंगलट? Gulabrao patil | एकनाथ खडसे आमच्या संपर्कात : गुलाबराव पाटील | ABPMajha