बीड : बीडमधील सुमीत वाघमारे हत्याकांडातील पीडित भाग्यश्री वाघमारेला आरोपींकडून धमक्या येत आहेत. गुन्ह्यातील आरोपी सध्या जामीनावर बाहेर असून भाग्यश्री आणि वाघमारे कुटुंबीयांवर गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकत आहे. या घटनेला आता एक वर्ष उलटलं असलं तरी सुमीत वाघमारेची पत्नी आणि त्याचं कुटुंब दहशतीखाली आहे.


डिसेंबर 2018 साली बीडमध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. प्रेमविवाह केल्याच्या रागातून आरोपीने सख्ख्या बहिणीच्या नवऱ्याचा दिवसाढवळ्या खून केला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. बालाजी लांडगेसह काही आरोपींनी खून केला होता. सुमीत वाघमारे या तरुणाची महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये हत्या करण्यात केली होती. या गुन्ह्यातील दोन आरोपी गजानन क्षीरसागर आणि कृष्णा क्षीरसागर हे सध्या जामीनावर बाहेर आहेत. दोघेही गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप भाग्यश्री वाघमारेने केला आहे.

दरम्यान वाघमारे कुटुंबाने या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली आहे. यापूर्वीही भाग्यश्रीला न्यायालय परिसरामध्ये शिवीगाळ झाली होती. त्यानंतर भाग्यश्रीसह वाघमारे कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे.

प्रेमविवाह केल्याने बायकोच्या भावाकडून तरुणाची हत्या

काय आहे प्रकरण?
सुमीत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगचं शिक्षण घेत होता. बीड शहरातील मावशीकडे शिक्षणासाठी सुमीत राहत होता. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या भाग्यश्रीसोबत त्याचे प्रेम जुळले. तब्बल तीन वर्षानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, मात्र दोन्ही कुटुंबियांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. मात्र घरच्यांच्या विरोध झुगारुन भाग्यश्री आणि सुमीतने लग्न केलं.

सुमीतशी लग्न केल्याचा राग मनात ठेवूनच भाग्यश्रीच्या भावाने त्याची हत्या केली. इंजिनीअरिंगची परीक्षा देऊन परतत असताना भाग्यश्रीचा भाऊ आणि त्याच्या मित्रांनी सुमीतवर धारधार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात सुमीतचा जागीच मृत्यू झाला, तर भाग्यश्री या हल्ल्यात जखमी झाली. हल्ला झाल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुमीतच्या मदतीसाठी भाग्यश्री याचना करत होती.

आरोपींवर अदखलपात्र गुन्हा : अप्पल पोलीस अधीक्षक
आरोपींच्या कुटुंबीयांकडून भाग्यश्री आणि वाघमारे कुटुंबाला धमकी मिळत असल्याने अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन, साक्षीदार आणि तक्रारदार यांना वैयक्तिक सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यानंतरही आरोपी अशाप्रकारची कारवाई करत असतील तर विस्तृत चौकशी करुन जामीनावर असलेल्या आरोपींचा जामीन रद्द करण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल," अशी माहिती बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी दिली.