Majha Maharashtra Majha Vision 2024 : अजित पवारांना (Ajit Pawar) पक्षात हवी होती ती पद दिली. अजित पवारांनी आता वेगळी विचारधारा मान्य केली आहे. आता त्यांनी त्यांच्या विचारधारेत काम करावे, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केले आहे. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवारांना पक्षात हवी होती ती पद दिली. अजित पवार आमच्याकडे असताना ते एकच उपमुख्यमंत्री होते. आता दोन उपमुख्यमंत्री आहेत. कामाचे वेगवेगळे विभाजन झालेले दिसत आहे. त्यांची काही वैयक्तिक कारणे असतील. मला असे वाटच नाही की, अजित पवारांमध्ये काही अस्वस्थता होती. त्यांना जे जे पद हवे होते ते ते पद त्यांना एकमताने देण्यात आले आहे. अध्यक्षपदाची मिटिंग होती मात्र त्याआधीच अजित पवारांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
...त्यामुळे आपली विश्वासार्हता वाढते
शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी अजित पवारांवर कार्यकर्ते सांभाळायची जबाबदारी देण्यात आली होती. अजित दादांना जाणीवपूर्वक व्हिलन ठरवले गेले, असे अजित दादांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अशा अनेक चर्चा होतात. ज्यांनी कोणी तुम्हाला असे सांगितले असेल त्यांनी त्या ऑन रेकॉर्ड सांगाव्यात. मला सगळे सांगायचे नाही. काही गोष्टी आयुष्यभर गुपित ठेवायच्या असतात. त्यामुळे आपली विश्वासार्हता वाढते, असेही त्यांनी म्हटले आहे.
आम्ही आमच्या विचारधारेत काम करू
शरद पवारांनीच अजित पवारांना सत्तेत सामील होण्यास सांगितले, अशी चर्चा होत असते. यावर सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, आता काहीच राहिलेले नाही. अजित पवारांनी आता एक वेगळी विचारधारा मान्य केली आहे. ती विचारधारा आमची नाही. त्यामुळे आता असा प्रश्नच येत नाही. त्यांनी त्यांच्या विचारधारेत काम करावे. आम्ही आमच्या विचारधारेत काम करू, असे त्यांनी म्हटले आहे.
माझ्यावर चव्हाण साहेबांचे संस्कार
प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष येतोच. आता माझी वेळ आहे. याआधीही संकट आलेत. अडचणी सगळ्यांना येतात. आपण मक्तेदारीतून बाहेर पडावे. राजकारण म्हणजे पक्ष फोडणे, घर फोडणे नव्हे. माझ्यावर चव्हाण साहेबांचे संस्कार झालेत. त्यात ८० टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करायचे असते, असे माझ्यावर संस्कार झालेत. आता 24 तास नुसते राजकारण सुरु आहे. मग देशाची सेवा कधी करणार? आता नैतिकता राहिली नाहीये. आता नैतिकता सोडून सगळे चालले आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
आणखी वाचा