Asaduddin Owaisi on Uddhav Thackeray : एबीपी माझा प्रस्तुत Majha Maharashtra Majha Vision 2024 मध्ये भविष्यातील महाराष्ट्राचा वेध घेण्यात आला. यावेळी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी चौफेर फटकेबाजी करतानाच काहीवेळा काहीशी तारांबळ उडाल्याचे दिसून आले. ज्या एमआयएमवर नेहमीच भाजपची बी टीम म्हणून सातत्याने आरोप होतो त्याच पक्षाचे अध्यक्ष अससुद्दीन ओवैसी यांनी महाराष्ट्रातील आगामी राजकीय भूमिका, महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्यांवर त्यांनी थेट भाष्य केले. ओवैसी यांनी सर्वाधिक उल्लेख अशोक चव्हाण यांचा करताना त्यांच्यावर आणि काँग्रेसवरही तोफ डागली.
पक्ष फुटल्यानंतरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्माण केलेल्या झंझावाताने सत्ताधारी महायुतीमध्ये भीती असतानाच राज्यातील अल्पसंख्यांक समाजामध्येही ठाकरेंची सहानूभुती असल्याची चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ओवैसी यांना महाराष्ट्रात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
एमआयएम उमेदवार उतरवून मतांची विभागणी करत आहे का?
आगामी लोकसभेच्या निवडणुकीला राज्यातील अल्पसंख्याक समाजाची मते ठाकरेंना दिशेनं जात असताना एमआयएम उमेदवार उतरवून मतांची विभागणी करत आहे का? अशी विचारणा त्यांना करण्यात आली. यावेळी बोलताना ओवैसी औरंगाबाद लोकसभा निवडणुकीचा दाखला दिला. ते पुढे म्हणाले की, औरंगाबादची जागा सेनेच्या उमेदवाराचा पराभव करून इम्तियाज जलील यांनी जिंकली. हा जनतेचा निर्णय होता. येत्या निवडणुकीला इम्तियाज पुन्हा निवडून देतील, अशी आशा आहे.
मुंबईत तिकिट द्यावे आणि जिंकून आणावे
त्यांनी सांगितले की, आम्ही उभं राहून मत घेत आहोत ही चुकीची भावना आहे. आम्ही उभं राहून मत घेत आहोत, तर मुस्लीमांना तिकिट का देत नाही? अशी विचारणा त्यांनी केली. आपल्याला कोण रोखलं आहे, मत हवीत पण तिकिट देणार नाहीत ही दांभिकता आहे. मुंबईत तिकिट द्यावे आणि जिंकून आणावे, असे आव्हान त्यांनी दिले. मतं घेत आहेत पण मुस्लीम नेते नकोत, अशी स्थिती आहे. साथ हवी, जिंदाबादचे नारे आणि सेल्फी घेतात. इफ्तार खजूर तोंडात घाला झालं काम अशी स्थिती असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसकडून होत असलेल्या भाजपच्या बी टीम आरोपाचा फरक पडत नसल्याचे ते म्हणाले. मला कोणत्याही भाषेतून शिव्या दिल्या, तरी फरक पडत नाही. आम्ही योग्य काम करत आहोत. काँग्रेस आमच्यावर आरोप करत असाल, तर अशोक चव्हाण का सोडून गेले? मी त्यांना सोडलं नाही. नेतेही सोडून गेले, राहुल गांधीही हरले. मुस्लीम नेतृत्व नको ही त्यांची भावना आहे. सगळ्यांचा नेता होऊ शकतो, पण मुस्लीमांचा नेता होऊ शकत नसल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या