मुंबई : गेल्या सरकारपासून प्रलंबित असलेल्या शिक्षण भरतीवरही त्यांनी आपलं मत मांडलं. शिक्षक भरतीबाबत प्रयत्न सुरु आहेत, असं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. राज्यात आणि देसात 31 ऑगस्टपर्यंत शाळा सुरु होणार नाहीत, हे स्पष्ट आहे. मात्र सप्टेंबरमध्ये कोरोनाची परिस्थितीत सुधार होईल आणि जनजीवन सुरळीत होईल आणि शाळाही सुरु होतील अशी अपेक्षा वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली. तसेच शाळा सुरु झाल्यानंतर सर्वोतपरी काळजी घेणेही मोठी जबाबदारी असणार असल्याचं त्यांनी सांगितलं.


विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच राज्याला कोरोनाने विळखा घातला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. अशातच आता या जीवघेण्या कोरोना व्हायरसमधून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सरकारचं व्हिजन काय आहे? त्याचबरोबर कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिणामांचा सरकार कसा सामना करणार आहे? तसेच सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम माझा महाराष्ट्र माझं व्हिजन हा कार्यक्रम आज होत आहे.


कोविड 19 च्या प्रादुर्भावमुळे शाळा, कॉलेज बंद आहेत. विद्यार्था शिक्षणापासून वंचित राहू नये शिवाय, त्यांचं आरोग्यही आमची प्राथमिकता आहे, त्या दृष्टीने आम्ही शिक्षण विभागामार्फत काम सुरु केलं. अनेक मुलं आता ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. मुलांपर्यंत पुस्तके पोहोचवण्याचं शिक्षकांनी केलं. शिक्षक केवळ शिकवण्याचं नाही तर शिक्षणासाठी मदतीचंही काम करत आहेत. लॉकडाऊमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमही आम्ही कमी केला, जेणेकरुन विद्यार्थ्यांवर कोणतंही दडपण येऊ नये, अस शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं. गावपातळीवर असलेल्या जिल्हा परिषद शाळांना स्मार्ट शाळा करावं लागणार आहे. मुलांच्या अंतर्गत मुल्यांना वाव देणारी शिक्षण व्यवस्था केली दिलं गेलं पाहिजे, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.


गेल्या सरकारपासून प्रलंबित असलेल्या शिक्षण भरतीवरही त्यांनी आपलं मत मांडलं. शिक्षक भरतीबाबत प्रयत्न सुरु आहेत. राज्यात शिक्षण भरतीची आवश्यकता आहे. त्याबाबत काम सुरु आहे. काही निर्णय मंत्रिमंडळामार्फत घेतले जातात, मात्र सरकार म्हणून याबाबत सकारात्मक आहोत. विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. शिक्षक सेवकांच्या बाबतीत वित्त विभागाशी चर्चा सुरु आहे, असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर हे देखील आपलं व्हिजन मांडणार आहेत. त्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आरोग्य मंत्री राजेश टोपे, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि कृषी मंत्री दादाजी भुसे या नेत्यांनी आपलं व्हिजन मांडलं. याशिवाय मनोरंजन क्षेत्राचं व्हिजन काय असावं यावर चर्चा झाली. यामध्ये अभिनेते प्रशांत दामले, दिग्दर्शक महेश मांजरेकर, निर्माते नितीन वैद्य, संगीतकार अतुल गोगावले सहभागी होणार आहेत.


इतर बातम्या