Majha Katta : खाणपाणाच्या दुनियेतील अनेक विक्रम नावावर असलेले सलग 52 तास स्वयंपाक करणारे जगातले एकमेव शेफ, म्हणून विष्णू मनोहर प्रसिद्ध आहेत. कधी ते 3000 किलोंची खिचडी बनवून गरीबांचे अन्नदाते बनतात, तर कधी 7000 किलोंची मिसळ बनवून खवय्यांचे चोचलेदेखील पुरवतात विस्मरणात गेलेल्या अनेक पदार्थांना त्यांनी आता पुन्हा एकदा गृहिणींच्या स्वयंपाक घरात पोहचवलं आहे. भारतीय खाद्यसंस्कृती निगुतीनं जपणारे सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी एबीपी माझाच्या 'माझा कट्ट्या'वर हजेरी लावली आहे.
दिवाळीच्या फराळात ट्विस्ट आणण्यासाठी काही पदार्थ घरी बनवले गेले पाहिजे. तर काही पदार्थ बाहेरुन आणायला हवेत. दिवाळीत घरी येणाऱ्या पाहुण्यांना फक्त फराळ खायला न देता वेगवेगळ्या चविष्ट भाज्या, पुलाव खायला दिले पाहिजे, असे विष्णू मनोहर यांनी सांगितले. शेफ विष्णू मनोहर यांचे 'विष्णू जी की रसोई' महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेच पण गेल्या दोन-अडीच वर्षांत महाराष्ट्रासह परदेशातदेखील 'विष्णू जी की रसोई' सुरू झाले आहे. विष्णू मनोहर हे मराठी पदार्थ सातासमुद्रापार नेणारे 'बल्लवाचार्य' आहेत.
'विष्णू जी की रसोई' 2007 सालात सुरू झाले. बजेटची चिंता न करणारे मराठी, पंजाबी खाद्यसंस्कृतीचे रेस्टॉरंट सुरू करण्याचा त्यावेळी विचार केला होता. 'विष्णू जी की रसोई' हे नाव ठेवण्यामागची गंमत म्हणजे, 'माझा' एका कार्यक्रमातून 'विष्णू जी' हे नाव घराघरात पोहेचले होते. मराठी प्रेक्षक 'विष्णू जी' म्हणून ओळखायचे पण हिंदी भाषिकांनादेखील आपलं रेस्टॉरंट आहे असं वाटावं या विचारातून .'विष्णू जी की रसोई' हे नाव ठेवण्यात आलं. अशाप्रकारे विष्णू मनोहरांनी माझा कट्ट्यावर 'विष्णू जी की रसोई' या नावाचं रहस्य उलगडलं.
अमेरिकेत भातावरचं पिठलं हा प्रकार सुरू केला आहे. त्यासाठी सजावटीसाठी मेहनत घेतली आहे. आपला पदार्थ सजावटीने, बोलण्यातून समोरच्यावर लादला तर तो खाल्ला जात असतो. पदार्थाचा शोध हा बऱ्याचदा अपघाताने घडत असतो. आम्ही किचनमध्ये मराठी पदार्थ चुलीवर बनवतो, तर पंजाबी पदार्थ गॅसवर बनवतो. त्यामुळे त्या पदर्थांना विशिष्ट चव येते. तसेच पदार्थ बनवताना तांब, पितळ, लोखंडाचा वापर करतो. त्यामुळे पदार्थांना चांगली चव येते, अशाप्रकारे विष्णू मनोहर यांनी माझा कट्ट्यावर चवदार गप्पा मारल्या आहेत.
आपण आपल्या कार्यक्रमांमध्ये मराठी पदार्थ बनवले पाहिजेत. मराठी पदार्थ किचकट असले तरी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तुमचे जेवणाचे ताट नैसर्गिक रंगांनी रंगीत झाले पाहिजे. शिवाजी महाराजांनी अन्नाचं नियोजन कसं केलं, जेवणामुळे महाराजांनी लढाया कशा जिंकल्या याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. शिवकालीन खाद्यसंस्कृतीचे प्रकार आम्ही त्या त्या गडकिल्यांवर जाऊन बनवले आहेत. लवकरच आम्ही शिवकालीन खाद्यसंस्कृतीचे प्रकार खवय्यांसाठी घेऊन येणार आहोत, असे माझा कट्ट्यावर खुमासदार संवाद साधताना विष्णू मनोहर यांनी सांगितले.