Suraj Yengde : संधी मिळाल्यानंतर दलितांनी स्वत:ला सिद्ध करून दाखवलं आहे, देशातील जातीभेद संपण्यासाठी अजून दोन पिढ्यांचा कालावधी जावा लागेल, अशी प्रांजळ कबुली प्रख्यात आंबेडकरी विचारवंत, लेखक, तरुण संशोधक डॉ. सुरज एंगडे यानी दिली. त्यांनी आज एबीपी माझा कट्ट्यावर आपलं मनोगत व्यक्त करताना नांदेडमधील छोट्या शहरापासून ते ऑक्सफर्डपर्यंतचा प्रवास कसा होता? ते माझा कट्टावर सांगितले. देशातील तसेच परदेशातील अनुभव कसा होता या संदर्भात त्यांनी भाष्य केले.
डॉ. सुरज एंगडे म्हणाले की, आमचा जन्म पिवळं रेशन कार्ड असलेल्या घरामध्ये झाला. एका खोलीमध्ये कुटुंब होते. ते पत्र्याचे घर होतं. आमचं घर म्हणजे हवामान केंद्र होतं. त्यामुळे घरामधूनच कळायचे की बाहेर स्थिती काय आहे. त्यामुळे आमचे आई-वडील पाऊस पडत असल्यानंतर आमच्यावर पाणी पडू नये म्हणून तांबे घेऊन उभा राहत असतं.
डॉ. सुरज एंगडे यांनी शाळेनंतर आलेले अनुभव सांगितले. शाळेनंतर जे काही त्यांना अनुभवलं ते वेगळं होत, असं त्यांनी नमूद केलं कोणत्याही मित्रांनी विशेष करून निमंत्रित केले नसल्याचे ते यावेळी म्हणाले. मित्र कधीही घरी आले नाहीत आणि जेव्हा मी त्यांचा घरी जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांनी कधी घरी घेतलं नाही. हा जातीचा परिणाम मला दिसून आला. त्यामुळे मानसिक आघात होत गेल्याने स्वीकारणे भाग पडल्याचे ते म्हणाले.
सुरज यांनी जाती अंतावर भाष्य केले. ते म्हणाले की जात सांगून कधी जात नसते. त्यांनी यावेळी बोलताना स्वतःचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, माझे आजोबा छोटसं गावकीचं काम करत होते (गावामधील छोटी मोठी दुय्यम काम) आणि त्यावेळी त्यांना त्याच्या बदल्यामध्ये धान्य दिलं जात होतं. मात्र, माझे वडील हे नववीपर्यंत शिकले आणि ते शिपाई होते. बँकेमध्ये ते क्लर्क कम वॉचमनचे काम करतो. आता मी शिकलो आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा दलितांना संधी मिळाली आहे तेव्हा त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. देशांमध्ये जातीभेद आहे तो इतक्यात संपणार नसल्याचे त्यावेळी म्हणाले. मात्र, बदल झाल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी बोलताना त्यांनी देशात राजकीय एकोपा शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. देशातील राजकीय पक्षांमध्ये उच्चवर्णीयांच्या हातात राजकीय पक्षांचे नेतृत्व कसं सामावलं गेलं आहे याबाबत त्यांनी भाष्य केले.