Majha Katta : मराठी साहित्यामध्ये टोळी युद्धासारखा प्रकार असून साहित्य हे गटातटात विभागलं गेलं आहे. एखाद्या कादंबरीवर समिक्षक कोण लिहिणार आणि ते कुठं छापून येणार हे आधीच ठरलेलं असतं. या समीक्षकांमुळेच मराठी साहित्याचं नुकसान झाल्याची खंत 'पानिपत'कार विश्वास पाटील यांनी व्यक्त केली. एबीपी माझा आयोजित साहित्य संमेलन विशेष 'माझा कट्टा' या कार्यक्रमात ते बोलत होते.
विश्वास पाटील म्हणाले की, "मराठी साहित्य हे गटातटात विभागलं गेलं. त्यामुळे अनेक कादंबऱ्यांना न्याय मिळाला नाही. 'माकडीचा माळ' सारख्या कादंबरीकडे मराठी समीक्षकांनी कधीच बघितलं नाही. मराठी साहित्य विश्वात समिक्षक आपापल्या गोतावळ्यात रमले, त्यामुळे नुकसान झालं."
शिवस्माकापेक्षा शिवरायांच्या खऱ्या स्मृती जपाव्यात
अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या मुद्द्यावर विश्वास पाटलांनी सडेतोड भूमिका मांडली. ते म्हणाले की, "उठसुठ अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवतेशी शिवरायांच्या पुतळ्याशी तुलना करणं हे चुकीचं आहे. शिवरायांचा इतिहास हा अमेरिकन स्वांतत्र्यापेक्षा दोनशे वर्षे जुना आहे. एका बाजूला शिवस्मारकासाठी कोट्यवधीची रक्कम खर्च केली जातेय तर दुसरीकडे सह्याद्रीच्या अंगावरच्या शिवरायांच्या स्मृती संपत आहेत. या स्मृती जपल्या पाहिजेत."
पानिपतची निर्मिती कशी झाली?
विश्वास पाटील म्हणाले की, "द न्यू हिस्ट्री ऑफ इंडिया' हे रियासतकारांचं पुस्तक वाचलं. त्यामध्ये पानिपत वाचलं. त्यावेळी ठरवलं की पानिपतवर लिहायचं. वयाच्या 23 व्या वर्षापासून ते 28 व्या वर्षापासून तयारी केली आणि पानिपत लिहिलं. पानिपत लिहिताना मला अनेकांनी विरोध केला. जे घडले आहे, आपला पराभव झाला त्यावर काय लिहिणार असा प्रश्न विचारला गेला. 1986 च्या मार्च मध्ये पानिपतला गेलो. उसाच्या शेतामध्ये भाऊसाहेबांच्या स्मृतीस्थळाचा शोध घेत घेतला. आता त्या ठिकाणी 14 जानेवारीला लाखो लोक जमतात.
नंतर एकदा पीव्ही नरसिंहरावांनी महाराष्ट्र टाईम्समधील परीक्षण वाचलं आणि त्यांच्या प्रयत्नामुळे पानिपत हिंदीत आली. अनेकांनी आपल्या कामाचं कौतुक केलं असंही त्यांनी सांगितलं.
सरकारी नोकरीने समाधान आणि वाद
सरकारी नोकरीमुळे अनेकांच्या समस्या सोडवल्या, पण वाद हा पाचवीलाच पुजलेला होता असं विश्वास पाटील म्हणाले.
संबंधित बातम्या :
- Majha Katta : मालिकेचा लेखक ते प्रयोगशील दिग्दर्शक, 'कोर्ट' फेम दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेचा प्रेरणादायी प्रवास
- Majha Katta: ...अन् ब्राव्होची हरवलेली बॅट सचिननं एका क्षणात ओळखली! मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममधील हा भन्नाट किस्सा नक्की वाचा
- 'तू तुझ्या नावाची काळजी घे, मी माझ्या नावाची काळजी घेईन' विलासरावांचा तो सल्ला अन् रितेशचं आयुष्य बदललं