मुंबई : कोणत्याही स्रीकडे असलेल्या बऱ्याच साड्यांपैकी एक साडी तिच्यासाठी खूप खास असते. ती साडी म्हणजे अर्थातच पैठणी (Paithani). याच पैठणी व्यवसायातील सुविख्यात नाव म्हणजे 'कापसे पैठणी'(Kapse Paithani) . कापसे पैठणीचे सर्वेसर्वा बाळकृष्ण कापसेंनी त्यांच्या या अनुभवाचे अनेक पदर 'माझा कट्ट्या'वर उलगडले. शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या बाळकृष्ण कापसे यांनी पैठणी घडवण्यास कशी सुरुवात केली या प्रवासाबद्दल त्यांनी माझा कट्ट्यावर सांगितलं.  मुळात शिक्षणाची आवड असेलल्या बाळकृष्ण यांनी घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे अत्यंत हालाखीचे दिवस पाहायला लागले. त्यामुळे त्यांनी शिक्षण पूर्ण होईपर्यंत पडेल ते काम केलं. दुसऱ्यांच्या पैठणीच्या दुकानात काम करता करता स्वत: पैठणीचं साम्राज्य त्यांनी घडवलं. 


काय आहे कापसेंच्या पैठणीची गोष्ट? 


बाळकृष्ण कापसेंचे आई-वडिल हे उसतोड कामगार होते आणि घरात सहा भावंड होती. त्यांच्या या प्रवासाबद्दल सांगताना कापसे यांनी सांगितलं की, 'घरात प्रत्येकानं काम करणं तितकचं गरजेचं होतं. म्हणून आम्ही गोवऱ्या थापून आम्ही त्या येवल्याला जाऊन विकायचो. सुरुवातीचे दिवस अत्यंत हालाखीचे होते. नोकरी करुन शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर एका नामांकित पैठणीच्या दुकानात काम करायला सुरुवात केली. तिथे पैठणीचे अनेक पदर शिकण्यास वाव मिळाला. लग्न झाल्यानंतर सगळा प्रपंच चालवणं हे जरा कठिण होऊ लागलं. त्यामुळे मी मालकांकडे थोडा पगार वाढवण्याची मागणी केली. मी भारतभर विमानाने फिरायचो पण माझा पगार हा केवळ दोन हजार रुपये होता. त्यांनी पगार वाढवण्यास नकार दिल्याने मी नोकरी सोडली आणि गावाकडे जाऊन शेती करायला लागलो. तर मी सुरुवातीला ज्या शाखेमध्ये राहायचो त्यांनी मला पैठणीचा व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर 2003 माझा पैठणीच्या दिशेने प्रवास सुरु झाला. वणी सप्तश्रृगींला पहिली साडी देऊन स्वत:च्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. राधाकृष्ण विखे पाटलांच्या वडिलांनी स्वत:चा व्यवसाय करण्यास कायम प्रवृत्त केलं. त्यामुळे मी त्यांच्याकडे माझ्या सुरुवातीच्या साडया घेऊन गेलो.' 


कशी असते 11 लाखांची पैठणी?


कापसे यांची सर्वात महाग पैठणी ही 11 लाख रुपयांची आहे. त्यांनी या 11 लाखाच्या पैठणीचा देखील प्रवास माझा कट्ट्यावर सांगितला. यावर बोलताना बाळकृष्ण कापसे यांनी म्हटलं की, '11 लाखांच्या पैठणीमध्ये सोने आणि चांदीचा वापर केला जातो. दोन कारागिरांना 11 लाखांची पैठणी बनवण्यासाठी चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागतो. तर या पैठणीमध्ये सोन्याचा जर वापरला जातो.' 


खरी पैठणी कशी ओळखायची?


ग्राहकांना खरी पैठणी कशी ओळखायची याच्या काही सोप्या पद्धती बाळकृष्ण कापसे यांनी माझा कट्ट्यावर सांगितल्या. यावेळी बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'खऱ्या पैठणीची मागची बाजू आणि पुढची बाजू या दोन्हीही सारख्या असतात. तर ती सेमी पैठणी असते तिचा पदराच्या मागच्या बाजूचे धागे हे लगेच दिसतात. त्यामुळे ती सेमी पैठणी आहे हे लगेच ओळखता येते. पैठणीचे बुट्टे, पदर आणि जरीवरुन खऱ्या पैठणीची ओळख होते.' 


यावेळी पेशवे काळातील पैठणी देखील कापसे यांनी माझा कट्ट्यावर सादर केली. या पैठणीमध्ये झाडांचा रस, सोने चांदी यांचा वापर केला जायचा. 1760 मधील पेशव्यांचे महावस्राचं कापसे यांनी दाखवलं. अनेक जुन्या पैठणींची ओळख देखील बाळकृष्ण पाटील यांनी माझा कट्ट्यावर करुन दिली. 


अंबानी देखील कापसेंच्या पैठणीचे चाहते 


प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे देखील कापसेंच्या पैठणीचे चाहते आहेत. अंबानी कुटुंबिय त्यांच्या विशेष कार्यक्रमासाठी कापसेंची पैठणी नेसण्याचा अट्टाहास धरतात. त्यामुळे कापसेंचं आणि अंबानी कुटुंबियांचं एक खास नातं असल्यांच देखील बाळकृष्ण कापसे यांनी सांगितला आहे. तर मुकेश अंबानी यांच्या सुनेसाठी म्हणजेच राधिकासाठी पैठणीचा घागरा विणण्याची ऑर्डर दिल्याचं देखील कापसे यांनी कट्ट्यावर सांगितलं. 


इतकचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील वहिनींचे लाडके भावजी म्हणजे आदेश बांदेकर यांच्या होम मिनिस्टर या कार्यक्रमासाठी जी पैठणी वापरली जाते ती कापसेंचीच असते. तर गेली वीस वर्ष ही कापसेंची पैठणी आदेश भोवजींमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहचल्याचं कापसेंनी यावेळी सांगितलं. 


बाळकृष्ण कापसे यांनी त्यांच्या कापसे फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचं देखील काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी त्यांच्या या संस्थेच्य माध्यमातून अनेकांना मदतीचा हात दिली. दरम्यान त्यांच्या या संस्थेच्या माध्यमातून अनेक गरजूंचं संगोपन केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. 


हेही वाचा : 


शमीमा अख्तर आणि संजय नहार 'माझा कट्टा' वर... , पाहा खास गप्पांची मैफिल