Majha Katta Vithal Kamat :  आयुष्यात यश आणि अपयश यांच्यातील समतोल साधणे आवश्यक आहे. विठ्ठल कामत यांनी डोंगरा एवढ्या कर्जातून मार्ग काढत आज आपली यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. रोजच्या जगण्यातील आर्थिक-मानसिक संतुलन कसे साधायचे, याबाबत उद्योजक विठ्ठल कामत यांनी (Vithal Kamat) आपले अनुभव माझा कट्टावर व्यक्त करत उद्योजक, प्रेक्षकांना मार्गदर्शन केले.  कोणीही कधीही, कोणत्याही व्यक्तीने आत्महत्या करू नये. त्यांच्या पश्चात कुटुंबीयांवर डोंगर कोसळतो. त्यांना याचा त्रास अधिक होतो. कधीही आत्महत्या करू नये असे आवाहन त्यांनी केले. 


विठ्ठल कामत यांनी सांगितले की, आत्महत्या करण्याचा विचार पक्का झाला होता. त्यावेळी मरीन ड्राइव्हवरून चालत होतो. सायंकाळची वेळ असल्याने सूर्य परतीच्या वाटेवर होता. त्या बुडत्या सूर्याकडे कोणीही पाहत नव्हते. सगळ्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. आपली देखील परिस्थिती हीच आहे. त्यानंतर ऑफिसला आलो. त्यावेळी एक रंगारी समोरच्या इमारतीला सुरक्षित उपकरणे न लावता रंग लावत होता. अवघ्या सहा हजार रुपयांसाठी जीव धोक्यात घालून त्याने काम केले. त्याच्याकडे पाहून प्रेरणा मिळाली. दुसऱ्या दिवशी उगवत्या सूर्याला सगळ्यांनी नमस्कार केला. या प्रसंगाला पाहून अपयशासोबत दोन हात करण्याची हिंमत मिळाली असल्याचे व्यावसायिक विठ्ठल कामत यांनी सांगितले. 


मराठी माणूस हा यशस्वी उद्योजक होऊ शकतो आणि आहे असेही विठ्ठल कामत यांनी म्हटले. 1996 मध्ये बँकेत कर्ज काढण्यासाठी गेलो असताना हॉटेल व्यवसायात न उतरण्याचा सल्ला काहींनी दिला होता. मराठी आहेस पंचतारांकीत हॉटेल काढू शकत नाही असे काहींनी म्हटले असल्याची आठवण त्यांनी सांगितली. मात्र, निर्णयावर ठाम राहत आशियातील पहिले पर्यावरण स्नेही हॉटेल सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.  कपड्यांवरून अनेकांना माझी पत काय आहे, हे पाहण्याचा प्रयत्न केला. बँकेनेही कर्ज देताना याबाबत शंका उपस्थित केली होती. त्यावेळी त्यांना कपडे पाहून नका असे सांगितले. माझा मॅनेजर महागडा पेन वापरतो...तो लोकांसमोर असणार आहे... मी पडद्या मागून सूत्रे हलवणारा आहे...माझ्या कपड्यांकडे लक्ष देऊ नका अशी आठवणदेखील विठ्ठल कामत यांनी सांगितली. 


माणूस सगळीकडून, चहुबाजूने चितपट झाल्यानंतर आत्महत्येचा विचार मनात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, टोकाचा निर्णय कधीच घेऊ नये. मात्र, त्यातून बाहेर पडण्यासाठी विविध मार्गांचा पर्याय तपासला पाहिजे असेही कामत यांनी सांगितले. 


आर्थिक दुष्ट चक्रातून बाहेर कसे पडलात?


विठ्ठल कामत यांनी आर्थिक दुष्ट चक्रातून बाहेर पडताना एक एक गुंता सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असल्याचे सांगितले. एक धागा सोडवला की इतर गुंते सोडवता येतात याकडे ही त्यांनी लक्ष वेधले. आपल्यावर असलेला कर्जाचा डोंगर उतरवताना आई वडिलांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरला असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जाची रक्कम मागण्यासाठी आलेल्यांना पैसे तुम्हाल पुन्हा मिळतील हे विश्वासाने सांगितले होते. कर्ज कमी करण्यासाठी काही प्रयत्न केले. त्यातून हॉटेल, महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या जागा, मालमत्तांची विक्री केल्याचे कामत यांनी सांगितले. त्याशिवाय, जुने संबंध असलेल्या बँकेच्या अधिकाऱ्यांनी मदत केली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगून नियमांच्या चौकटी कर्ज परतफेडीसाठी मुदतवाढ दिली असल्याचे त्यांनी सांगितले. 


बँकांची कर्जे फेडली की इतर बँका कर्ज देण्यासाठी पुढे येतात हे त्यांनी अनुभवाच्या आधारे सांगितले. मराठी माणूस हा कर्ज फेडतो. तो कुठेही पळून जात नाही, असेही कामत यांनी म्हटले. 


मराठी उद्योजक, व्यावसायिकांनी एकत्र येणे आवश्यक 


मराठी उद्योजक, व्यावसायिक एकत्र येत नाहीत. बैठक, स्नेह संमेलन होत नाही. त्याची गरज असल्याचे कामत यांनी सांगितले. बुडणाऱ्या माणसाला तरंगण्यासाठी किमान लाकडाचा ओंढका पाहिजे. इतर समूहांमध्ये अशी मदत केली जाते.. मराठी व्यावसायिकांना अशा मदतीची आवश्यकता आहे. अशा अरिष्टातून बाहेर आल्यानंतर तो यशाची तुतारी नक्कीच फुंकू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 


भावनिक गुंतवणूक किती ठेवायची...


आपल्याला भावनिक बंधात किती अडकायचे याचा विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. आपली आवडती व्यक्ती, गोष्ट कधीतरी दूर होणारच आहे.... हे लक्षात घ्या...ही बाब आपल्या आयुष्यापेक्षा महत्त्वाची नाही असा सल्लाही त्यांनी दिला.