NIA Raid In Bhiwandi :  भिवंडी तालुक्यातील पडघा भागातून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक आज आयसिस महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणात सहाव्या आरोपीला अटक केली. मुस्लिम कट्टरतावादी संघटनेनेसोबत संबंध असल्याच्या आरोपावरून आकिब अतीक नाचन याला ताब्यात घेण्यात आले आहे. आकिब  नाचन याने बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. याआधी पुणे, मुंबईतून देखील कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत NIA 5 जणांना ताब्यात घेतले आहे. आज झालेली ही सहावी अटक आहे. 


झुल्फिकार अली बडोदावाला, मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी आणि अब्दुल कादिर पठाण या सर्वाना काही दिवस पूर्वी NIA व महाराष्ट्र एटीएसने अटक केली होती. या चार आरोपींच्या सहकार्याने ISIS या नियुक्त विदेशी दहशतवादी संघटनेच्या दहशतवादाशी संबंधित कारवायांना प्रोत्साहन देण्यात आकिब सक्रीय असल्याची माहिती समोर आली आहे. 


आज पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास NIA ने आकीब नाचन याला पडघ्यातील नाचन मोहल्लामधील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. तसेच त्याच्या घरातून अनेक डॉक्युमेंट्स देखील जप्त करण्यात आले आहे . आकिब याने यापूर्वी अटक झालेल्या दोघांना घर मिळवून देण्याचा काम केलं होतं.  त्यांच्या राहण्याची-जेवण्याची व्यवस्था देखील त्यांनीच केली होती. 


तसेच यापूर्वी आकीब याने मध्य प्रदेश मधील रतलाममध्ये बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण आपल्या साथीदारांसोबत घेतले होते. या प्रकरणात गुजरात एटीएस आणि NIA ने 15 मे 2022 रोजी पडघा भागातील एका धाब्यावरून आकीबला अटक केले होते. दरम्यान आकिब 12 जानेवारी 2023 रोजी NIA च्या कोठडीमधून जामिनावर बाहेर आला होता. 


पुण्यातून सुरू झालेला तपास भिवंडीपर्यंत


विशेष म्हणजे बॉम्ब बनवण्याचा प्रशिक्षण घेतलेले आरोपी सर्वजण एकत्र का येत होते त्यांचं देशात घातपात घडवून आणण्याचा काही प्रयत्न होता का? येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी कुठे लक्ष्य होते का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्याकरता NIA ने  पुण्यातून सुरू केलेला तपास भिवंडीपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे या आरोपींना बॉम्ब बनवण्याचे पूर्ण प्रशिक्षण आहे . त्यामुळे हे सर्वजण एकत्र येऊन नक्की काय कट आखात होते याचा उलगडा NIA च्या तपासात उघड होईल. 


ISIS महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणात NIA ने केलेली ही सहावी अटक आहे, देशाची शांतता भंग करण्याच्या ISIS च्या कटाशी संबंधित आहे.  NIA ने 28 जून 2023 रोजी गुन्हा नोंदवला होता. गेल्या महिन्यात NIA ने पाच आरोपींना अटक केली होती. ताबीश नासेर सिद्दीकी, जुबेर नूर मोहम्मद शेख उर्फ अबू नुसैबा, शरजील शेख, झुल्फिकार अली बडोदावाला आणि डॉ. अदनान सरकार या संशियत आरोपींना कोंढवा, पुणे,  मुंबई, ठाणे येथून एनआयएने अटक केली आहे.