Majha Katta Gulabrao Patil: शिवसेनेमध्ये फूट टाळता आली असती. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी किंवा आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी राज्यभरात फिरून आमदारांची मते जाणून घेतली असती तर शिवसेनेत फूट पडली नसती, असे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी म्हटले. बंडानंतर आता उद्धव ठाकरे राज्यात फिरू लागले आहेत. उद्धव ठाकरे यांना त्यावेळी फिरता येत नव्हतं तर त्यांच्याऐवजी आदित्य ठाकरेंनी फिरायला हवं होतं. पोस्टमन म्हणून आमदारांची नाराजी आदित्य यांनी उद्धव यांच्यापर्यंत पोहचवली असती तर ही वेळ आली नसती असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले. 


मागील वर्षी झालेल्या शिवसेनेतील बंडाबाबत, सध्याच्या राजकारणाबाबत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी 'माझा कट्टा'वर विविध प्रश्नांना उत्तरे दिली. शिवसेनेत घडामोडीमुळे दु:खही वाटते आणि आनंदही वाटत असल्याचे त्यांनी म्हटले. बाळासाहेबांचे विचार, मराठी माणूस, हिंदुत्वाच्या विचारापासून दूर जात होतो. मात्र, आम्ही निर्णय घेतल्याने शिवसेनेला पुन्हा त्याच्या मुख्य मुद्दावर आणले असल्याचा आनंद वाटत असल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हटले. उद्धव ठाकरे हे सात-बारावरील वारस असू शकतात. पण, आम्ही विचारांचे वारसदार आहोत, असेही पाटील यांनी म्हटले.  सूरतला गेलेल्या काही आमदारांना पुन्हा बोलवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पण, त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद न आल्याने आमदार सूरतला निघून गेले असल्याचे पाटील यांनी म्हटले. पक्ष सोडून जाणाऱ्यांना थांबवण्यासाठी काहीच प्रयत्न झाले नाही, आमदारांना का थांबवलं नाही, असा प्रश्न आपल्याही पडला असल्याचे त्यांनी म्हटले. 


ठाकरेंना कोण बोलणार?


मुख्यमंत्री ठाकरे असताना त्यांनी विविध गुप्तचर खाते, पोलिसांचा अहवाल असतो. कोणता आमदार कोणाला भेटतो, मतदारसंघात काय चाललंय, याचा अहवाल त्यांच्याकडे आला असेल. पण, त्यांनी त्याकडे लक्षच दिले नसणार असेही पाटील यांनी सांगितले. आमच्या जिल्ह्यातील एक सरपंच आणि उपजिल्हाप्रमुख नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमात भाजपात प्रवेश करणार होता. त्या कार्यक्रमाच्या आधी दोन दिवस त्यांना सोबत बसवून नाराजी दूर केली. माझ्यासारखा माणूस एका सरंपंचाच्या नाराजीची दखल घेऊ शकतो. तर, ठाकरेंनी आमदारांची दखल घ्यायला हवी होती. असेही पाटील यांनी म्हटले. आमदारांचे दु:ख त्यांना कळले नसल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली. 


संजय राऊतांना टोला 


राऊत यांच्यासारखी माणसं कोणालाही पुढं येऊ देत नाहीत. त्यांच्या सारख्या माणसांमुळे पक्षाचे नुकसान होते. ह्यांच्या डोक्यात कायम पदाचा विचार असतो. आम्ही विविध आंदोलने केली, अनेक गुन्हे अंगावर घेतली. राऊत यांनी किती आंदोलने केली, किती गुन्हे आहेत असा सवाल त्यांनी केला. 


खोके, गद्दार संबोधनामुळे वेदना


खोके, गद्दारमुळे त्रास होत असल्याचे त्यांनी म्हटले. लोकांमध्ये आमची प्रतिमा वाईट झाली आहे. आम्ही काम करणारे लोक आहोत. त्यामुळे मतपेटीवर याचा परिणाम होणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोक नाराज आहेत, कार्यकर्ते नाराज आहेत हे मान्य करतो. पण निवडणुकीपर्यंत आम्ही या गोष्टी दुरुस्त करू असेही त्यांनी म्हटले. राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरेंच्या गटातील भास्कर जाधव सारख्या आमदारांनी आम्हाला खोके, गद्दार बोलू नये. त्यांनी किती वेळा पक्ष बदलला, हे त्यांनी पाहावे असा टोलाही त्यांनी लगावला. 


शिवसेनेत दाखल आणि पाचव्या दिवशी गुन्हा दाखल


गुलाबराव पाटील यांनी माझा कट्टामध्ये आपल्या शिवसेना प्रवेशाबाबतचा किस्सा सांगितला. 1987 च्या सु्मारास आम्ही काही लोकांनी मिळून शिवसेनेत दाखल झालो. आमच्याकडे शाखा सुरू केली आणि पाचव्या दिवशी एका आंदोलनात गुन्हा दाखल झाला असल्याचे त्यांनी म्हटले.  राजकारणात प्रवेश करणार नव्हतो. कुटुंबाची परिस्थिती सांभाळण्याचे आव्हान होते. राजकारण हा माझ्यासाठी पहिला पर्याय कधीच नव्हता असेही त्यांनी सांगितले. 1990 मध्ये शिवसेनेचा पहिला आमदार आमच्या जिल्ह्यातून निवडून आला होता. त्यावेळी 40 गावांची जबाबदारी आली होती अशी आठवणही त्यांनी सांगितली. वयाच्या 26 व्या वर्षी 1996 मध्ये मला बाळासाहेबांनी जिल्हाप्रमुख केले. त्यानंतर जिल्हा परिषद, सभापती आणि 1999च्या निवडणुकीत आमदार झालो असल्याची आठवण गुलाबराव पाटील यांनी सांगितली.