Majha Katta : दहा तारखेला आषाढी एकादशी आहे. पांढूरंगाला दंडवट घालून मागणी आहे, हे लवकरात लवकर मिटू दे... उद्धव ठाकरे यांनी शिंदेसाहेबांशी बोलून हे प्रकरण मिटवावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे, हे प्रकरण चालू राहिले तर आमच्याकडे लक्ष देण्यापेक्षा वारकऱ्यांकडे लक्ष द्यावे.
सत्य हे शेवटी सत्य असते. त्याला कुणी झाकू शकत नाही. अन् सत्य शिंदे साहेबांच्या बाजूने जाणार. याला कारणेही आहेत. एकनाथ शिंदे संयमी आणि शांत आहेत. त्यात त्यांना पाच वर्षाचा अनुभव असणारे देवेंद्र फडणवीस आहेत. राज्याचा पुढील अडीच वर्षाचा कारभार नक्कीच चांगला राहणार आहे.
शिवसेनेमधील अभूतपूर्व बंडाचे साक्षीदार आणि त्यांच्या एका डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेले सांगोला विधानसभा मतदार संघाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी बुधवारी माझा कट्ट्यावर हजेरी लावली. जितकी चर्चा सत्तांतराची झाली, नव्या मुख्यमंत्र्यांची झाली, शिवसेनेतील नाराजीची झाली... त्यापेक्षा जास्त फेमस शहाजी बापूंचा डायलॉग फेमस झाला. डोंगर, झाडी आणि हॉटेलचा डायलॉग फेमस झाला. त्यावर गाणेही आले. सोशल मीडियावर या डायलॉगची चर्चा रंगली आहे. शहाजी बापूंच्या, 'काय झाडी.. काय डोंगार.. काय हॉटेल.. एकदम ओक्के' या डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. या डायलॉगमुळे शहाजी बापू सोशल मीडियावर एका रात्रीत स्टार झाले. सत्तांतर, नवे मुख्यमंत्री आणि शिवसेनेतील नाराजीपेक्षा शहाजी बापूंच्या या डायलॉगची चर्चा जास्त झाली. अनेकांनी त्यांना पर्यटनमंत्री करा? अशी मागणीही केली. शहाजी बापू पाटील यांनी माझा कट्ट्यावर दिलखुलास गप्पा मारल्या...
शहाजी पाटील नेमकं आहेत तरी कोण?
- शहाजीबापू पाटील हे सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार
- विद्यार्थी दशेपासून शहाजी पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते
- 1985 साली त्यांनी दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवली
- 1985 च्या निवडणुकीत शहाजी पाटील यांचा पराभव
- त्यानंतर झालेल्या निवडणुकीतही त्यांचा पराभवच झाला
- 1995 मध्ये शहाजी पाटील हे 192 मतांनी निवडून आले
- त्यांनी 1995 ला गणपतराव देशमुख यांचा पराभव केला
- त्यानंतर 1999, 2004, 2009 आणि 2014 पर्यंतच्या सर्व निवडणुकीत शहाजीबापूंचा पराभव झाला
- 2019 ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला
- 2019 ला गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव करत शहाजीबापू आमदार झाले
अशी आमदार शहाजी पाटील यांची राजकीय कारकीर्द राहिली आहे. त्यांच्या बोलण्यात ग्राणीण ढंग आहे. त्यामुळं त्यांच्या भाषणाची सातत्यानं चर्चा देखील होत असते. अनेकवेळा त्यांची वक्तव्य चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, 2019 मध्ये शहाजी पाटील यांनी भाजपकडे तिकीट मागितले होते. मात्र, युतीत ही जागा शिवसेनेकडे असल्यानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शिवसेनेतून निवडून आणलं. त्यामुळंच फडणवीस यांच्यासोबत शहाजी पाटील यांची चांगलीच गट्टी आहे. त्यामुळं ते त्यांच्या संभाषणात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे होणार असल्याचे म्हणत आहेत. फडणवीसांचे आणि माझे नाते हे भाव-भावासारखे आहे, तर शिंदेसाहेब मला मुलाच्या नजरेनं बघतात असेही पाटील म्हणालेत.