Majha Katta : "माई गेल्यानंतर आयुष्याचे दोन भाग झाले. माई असताना एक निश्चितता होती. शांत झोप होती, त्या गेल्यानंतर आता काळजी व्यापून उरली आहे. आज माझी मुले पोटभर जेवत आहेत. परंतु, उद्याचं काय असा प्रश्न सतत उपस्थित होतो. माई गेल्यानंतर डोक्यावरचं छप्पर जावं आणि पायाखालची जमीन सरकावी अशी परिस्थिती निर्माण झाली. संस्थेसाठी अन्न धान्य मिळतं पण भविष्याची चिंता आहे. सिंधुताईंच्या निधनानंतर मदतीचा ओघ कमी झाला अशी खंत सामाजिक कार्यकर्त्या दिवंगत सिंधुताई सकपाळ (Sindhutai Sakpal) यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवणाऱ्या त्यांच्या कन्या समाजसेविका ममता सिंधुताई सपकाळ (Mamta Sakpal) यांनी व्यक्त केली. ममता सकपाळ यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी त्यांनी संस्थेच्या कार्याविषयी आणि सिंधुताई असतानाच्या आठवणींवर बोलत मनमोकळा संवाद साधला. 


ममता सकपाळ सांगतात, "सिंदुताई गेल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात चांगली मदत झाली. परंतु, माई गेल्यानंतर यंदाची पहिली दिवाळी दर वर्षीच्या दिवाळीसारखी साजरी झाली नाही. त्यामुळे त्यांची पोकळी जाणवली. सिंधुताई गेल्यानंतर संस्थेसाठी येत असलेल्या मतदीचा ओघ कमी झाला. परंतु, माईंच्या कामावर प्रेम करणाऱ्या ठराविक लोक आणि संस्थांकडून अजूनही मदत सुरू आहे. सरकारी अनुदान मिळतं परंतु, ही मदत फार कमी आहे. येणाऱ्या निधीला अनेक वाटा आहेत. अनेक प्रकारचे खर्च असतात. सध्या आमच्याकडे अन्न धान्य आहे. परंतु, निधीची आवश्यता आहे. माई गेल्यानंतर आम्ही सर्वच जण मोठे झालो आहोत. मुलं अंतर्मुख झाली आहेत. मुलं आमच्याकडे बघून जगत आहेत." 


सिंधुताई सकपाळ यांनी अनाथ मुलांचा सांभाळ करण्यासाठी पाच संस्था सुरू केल्या. याबाबत माहिती सांगताना ममताताई म्हणाल्या, "पुण्यातील संस्थेचं काम मी पाहते आणि सासवडच्या सेवा सदनचं काम सिंधुताईंनी सर्वात प्रथम सांभाळ केला ते दिपक दादा पाहतात. चिखलदऱ्याची संस्था अरूण भाऊ सांभाळतो. अशा आमच्या पाच संस्था आहेत. आमच्या पाच संस्थेत सध्या 210 मुलं आहेत. आमच्या संस्थेतील मुलींची लग्न करताना मागणीसाठी जे अर्ज येतात त्याची आम्ही मुलाच्या घरी जाऊन पाहणी करतो. जेणेकरून लग्नानंतर मुलींना कोणताही त्रास होऊ नये. माई गेल्यानंतर आम्ही नऊ मुलींचे विवाह करून दिले.  


'वयाच्या 18 व्या वर्षी वडिलांना पहिल्यांदा पाहिलं'


ममता यांनी सांगितलं की, "12 वी ला असताना मी पहिल्यांदा माझ्या वडिलांना पाहिलं. ते माझ्या मामांसोबत संस्थेत आले होते, त्यावेळी मी 18 वर्षांची होते. त्यामुळे माझं बालपण सर्व माईंनीच केलं. माईचं माझी सर्व होती. दरम्यान, यावेळी बोलताना ममता ताईंनी लोकांनी संस्थेला भेट द्यावी असे आवाहन केलं. "लोकांनी आमचं काम पाहावं. मदत नाही केली तरी चालेल. दर वेळी येताना तुम्ही काहीतरी आणायलाच पाहिजे असं नाही. हा तुमचा परिवार आहे असंच समजून येत जावा, असं मनापासून वाटतं, अशा भावना ममताताईंनी व्यक्त केल्या.