Pune Koyta Gang :  पुण्यातील ससून रुग्णालयाच्या आवारात (Pune crime) दोन गुन्हेगारी टोळ्यांमध्ये हाणामारी झाल्याने रुग्णालयाच्या आवारात एकच खळबळ उडाली. ही घटना दुपारी चारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे ससून हॉस्पिटल मध्ये भीतीचे वातावरण पसरले असून परिसरात खळबळ उडाली आहे. एका गंभीर गुन्ह्यातील आरोपींना ससून हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) आणण्यात आले असता दोन टोळ्यांमध्ये राडा झाला आहे. 


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरच्या रामटेकडी परिसरात दुपारी झालेल्या भांडणानंतर दोन्ही टोळ्या हडपसर पोलीस ठाण्यात गेल्या आणि पोलिसांनी तपास शाखेच्या कर्मचाऱ्यांसह त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाजवळ टोळ्यांमध्ये बाचाबाची झाली. टोळीतील साथीदारांनी चॉपर घेऊन एकमेकांवर हल्ला केला, त्यामुळे काही जण जखमी झाले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.


रुग्णालयात कर्तव्यावर असलेले सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोन्ही टोळ्यांतील गुंडांना अटक केली असून त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी एका आरोपीला शस्त्रासह ताब्यात घेतले. याबाबत हडपसर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत आरोपीला ताब्यात घेतले. आरोपींवर खुनाच्या प्रयत्नाचा (Attempted Murder) गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुण्यात सध्या कोयता गॅंगची दहशत वाढतच आहे. त्यामुळे अनेक परिसरातील लोकांना धास्ती बसली आहे. 


मागील सहा महिन्यांपासून पुण्यात दहशत माजवणाऱ्या गॅंग धुमाकूळ घालत आहे. कोयता गॅंग आणि चुहा गॅंगच्या अनेक आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलं आहे. मात्र या गॅंग अजूनही दहशत माजवत आहेत. त्यामुळे पुणे पोलीस चांगलेच अॅक्शन मोडवर आले आहेत. कोयता विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. त्यासोबतच अनेक कोयतेदेखील जप्त केले आहेत. पुणे शहरामध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचं दिसत आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणात गर्दीची अनेक ठिकाणं आहेत. या सर्व ठिकाणी गाडी घेऊन पेट्रोलिंग करणं शक्य होत नाही. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी पायी पेट्रोलिंग पोलिसांकडून सुरू करण्यात आलं आहे. पायी पेट्रोलिंगमुळे जनतेशी संवादही साधता येतो आणि गुन्हेगारीलाही आळा बसतोय, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन दिवसाआड पायी पेट्रोलिंग करून जनजागृती करत आहेत. दहशत माजवणाऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.