मुंबई: उद्धव ठाकरे यांच्यासोबत मतभेद नाही तर मनभेद झालेत, त्यांनी विश्वासघात केला, त्यांच्यासोबत भाजप कधीही जाणार नाही, त्यांच्यासाठी सध्यातरी भाजपची दारं बंद आहेत असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. पण अजित पवारांनी कधीही विश्वासघात केला नाही, त्यांच्याशी मतभेद आहे, पण मनभेद कधीही झालेला नाही असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. चंद्रशेखर बावनकुळे हे एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात बोलत होते. 


संजय राऊतांनी सकाळसकाळी वैयक्तिक टीकाटिप्पणी बंद करावी, वैयक्तिक आरोप करु नये, तुम्ही विकासावर बोला, त्यावर आपण चर्चा करु असं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. अजित पवारांनी एकदोनदा विकासावर भाष्य केलं, पण इतर विरोधकांनी नेहमीच वैयक्तिक टीका केली असंही ते म्हणाले.


विधानसभेच्या 200 जागा आणि लोकसभेच्या 48 जागा जिंकण्याचं भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचं असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. राज्यात भाजपचे 124 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील, ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे उमेदवार असतील त्या ठिकाणी त्यांना शंभर टक्के मदत केली जाईल असं ते म्हणाले. 


2019 सालच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती घसरत चालल्याचं दिसून येतंय. निसर्गाचा नियम आहे, तुम्ही जे करता ते परत येतं. अमित शाह यांनी प्रत्येक सभेमध्ये म्हटलं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, त्यावेळी उद्धव ठाकरे काहीच बोलले नाहीत. नंतर मात्र त्यांनी आपला शब्द बदलला आणि भाजपसोबत विश्वासघात केला. 


संजय राऊतांनी विकासावर बोलावं


संजय राऊत यांच्यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सुरुवात सकाळी 9 वाजता होते, त्यानंतर दिवसभर त्याचे परिणाम दिसतेय. आजपासून विकासावर चर्चा करायचं असं प्रत्येकानं ठरवलं पाहिजे. तुम्ही व्यक्तिगत टिकाटिप्पणी करु नका, वैयक्तिक आरोप करु नका, तुम्ही विकासावर बोला, त्यावर आपण चर्चा करु असं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना केलं.  


अजित पवारांनी एक दोनवेळा विकासावर भाष्य केलं, पण बाकीचे कुणीही त्यावर चर्चा करत नाहीत असं बावनकुळे म्हणाले. ते म्हणाले की, भाजपचे लोक संस्कारी आहेत, आम्ही पातळी सोडून बोलत नाही. संजय राऊत हे एकटेच बरोबर आहेत का? उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावं. 


तिकीट नाकारलं त्यावेळी पत्नीला थोडं वाईट वाटलं 


गेल्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षानं तिकीट नाकारलं होतं. त्यावर बोलताना ते म्हणाले की, "मी बुथवर काम केलं आहे, मी शेवटच्या रांगेत बसणारा कार्यकर्ता आहे. पक्षाने मला आमदार केलं, मंत्री केलं त्यामुळे गेल्या वेळी मला तिकीट नाकारलं याचं कधीही दुःख झालं नाही. पक्षाने तिकीट नाकारलं त्या सेकंदालाही मी प्रतिक्रिया दिली नाही. कारण माझी विचारधारा पक्की होती. उद्या मला पक्षाने घरी बसवलं तर तर मी घरी बसेन, कारण माझी विचारधारा पक्की आहे. गेल्या वेळी पत्नीचा अर्ज भरला पण नंतर माघार घ्यायला लावलं, त्यावर माझ्या पत्नीला काहीसं दुःख झालं होतं. घरात तिकीट द्यायला नको होतं, माझ्या मुलाचं किंवा पत्नीचं पक्षासाठी कोणतंही कर्तृत्व नव्हतं, पण पक्षादेश आला आणि पत्नीचा अर्ज भरला होता."