Marathwada Farmer Suicide : सलग तीन वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील (Marathwada) शेतकरी कर्ज, नापिकी, नैराश्याला कंटाळून टोकाचे पाऊल उचलत आहे. त्यामुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) काही थांबता थांबत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. धक्कादायक म्हणजे, गेल्या तीन महिन्यात मराठवाड्यात तब्बल 214 शेतकऱ्यांनी स्वतःच जीवन संपवून घेतलं आहे. तर मराठवाड्यात दररोज दोन शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करत असल्याचे समोर आले आहे. विशेष सर्वाधिक आत्महत्या बीड (Beed) जिल्ह्यात होत असून, गेल्या 90 दिवसांत बीडमध्ये 65 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. 

आधी अतिवृष्टी आणि आता त्यानंतर अवकाळी पावसाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केले आहे. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे अक्षरशः पिकं वाहून गेली. काही ठिकाणी तर शेतातील माती देखील वाहून गेली. त्यामुळे झालेल्या या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यात सरकारची मदत अजून मिळाली नाही. त्यामुळे घेतलेलं कर्ज कसे फेडायचं, बँकेकडून सतत सुरु असलेला तगादा, पैश्यासाठी सावकाराकडून होणारी मागणी आणि त्यात आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने कुटुंब चालवण्याची चिंता असल्याने शेतकरी आत्महत्या करत आहे. या नवीन वर्षात गेल्या तीन महिन्यांत 214 शेतकरी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांची ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. 

राजकीय नेत्यांना फक्त राजकारणासाठी हवा मराठवाडा 

मागील काही दिवसांत मराठवाडा राजकीय नेत्यांचा केंद्रबिंदू बनला आहे. त्यामुळे मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरात नेत्यांनी सभांचा धडाका लावला आहे. सत्तधारी आणि विरोध दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे एकामागून कार्यक्रम मराठवाड्यात सतत होत आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा झाली असून, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धनुष्यबाण यात्रा निघणार आहे. यापूर्वी देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी सिल्लोड, पैठणमध्ये जाहीर सभा घेतल्या. मात्र आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी येणाऱ्या राजकीय नेत्यांना शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वेळ नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

शेतकरी आत्महत्या आकडेवारी (नवीन वर्षातील 90 दिवस)

अ.क्र. जिल्ह्याचे नाव  शेतकरी आत्महत्या 
1 छत्रपती संभाजीनगर  23
2 जालना  15
3 परभणी  18
4 हिंगोली  05
5 नांदेड  31
6 बीड  65
7 लातूर  14
8 धाराशिव  43
  एकूण  214

महत्वाच्या इतर बातम्या : 

मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे 99 टक्के पंचनामे, आता प्रतीक्षा नुकसानभरपाईची