रत्नागिरी : दापोली तालुक्यातील कर्दे गावातली उद्ध्वस्त पड्याळ कुटुंबियांची कहाणी 'एबीपी माझा'नं दाखवली होती. त्यानंतर रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी तातडीनं या बातमीची दखल घेत या कुटुंबीयांना मदत करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे या कुंटुबाला 1 लाख 60 हजारांची मदत पोहचती करण्यात आली. मदत मिळाल्यानंतर या कुटुंबियांच्या चेह-यावर आनंद दिसत होता.


3 जूनला निसर्ग चक्रीवादळात या कुटुंबियांचं घर उद्ध्वस्त झालं होतं. निसर्ग वादाळानंतर कोकणवासियांच्या आयुष्यात अंधार निर्माण झाला आहे. दोन आठवडे झाल्यानंतर कोकणवासिय अंधारात दिवस काढत आहेत, कोण दुस-यांच्या घरी दिवस काढतंय तर कोण शासनाच्या मदतीची वाट बघतंय डोक्यावरचं छप्पर उडालं होतं, घरात चूल पेटवायची सोय उरली नव्हती, सर्व सामान अस्थावस्थ पडलं होतं. त्यामुळे घर पुन्हा उभं करण्यासाठी लागणा-या मदतीकडे या कुटुंबियाचं लक्ष लागलं होतं अखेर आज या कुटुंबियांना मदत मिळाली आहे.



कोण आहेत हे पडयाळ कुटुंबिय

दापोली तालुक्यातील कर्दे गावात राहणारं हे कुटुंब आहे. सुषमा पड्याळ यांच्यासोबत त्यांना हिमतीनं साथ देणारी त्यांची मुलगी या दोघीच या घरात राहतात. घरात आधार देणारा पुरुष नसल्यानं या कुटुंबावर संकंट कोसळलं होतं. निसर्ग वादळानंतर होत्याचं नव्हतं झालं होतं, डोळ्यादेखत बांधलेलं घर उद्ध्वस्त झाल्यानं या माय-लेकींसमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. गावात प्रत्येकाचं नुकसान झाल्यानं त्यात कोरोनाची परिस्थिती असल्यानं मदतीच्या प्रतिक्षेत हे कुटुंब होतं. शासनाकडून पंचनामे पूर्ण करण्यात आले होते पण दोन आठवड्यानंतर मदतीचा पत्ता नव्हता त्यामुळे शेजाऱ्यांच्या घरात राहून हे पड्याळ कुटुंबिय दिवस काढत होते. दिवसभर राबायचं आणि मिळेल त्यात समाधान मानायचं अशी अवस्था या कुटुंबियांची होती पण तरीही घर उभं करण्याची त्याची जिद्द होती

कोकणवासियांना पालकमंत्र्यांचं मदतीचं आश्वासन

पडयाळ कुटुंबीयांची व्यथा 'एबीपी माझा'नं समोर आणल्यावर पालकमंत्री अनिल परब यांनी तातडीनं दखल घेतली. दापोलीच्या सीईओंना आदेश दिले आणि तात्काळ मदत पोहचती केली. आज पड्याळ कुटुंबियांसारखे अनेक लोक आहेत जे मदतीच्या प्रतिक्षेत आहेत, पंचनामे झाले असले तरी मदत मिळत नसल्यांच्या घटना समोर येत आहेत. म्हणून तळगाळातल्या लोकांपर्यत मदत पोहचवण्याचे आदेश पालकमंत्री अनिल परब यांनी दिले आहेत निसर्ग चक्रीवादळात रत्नागिरी आणि रायगडचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.या वादळानंतर अनेक नेत्यांनी कोकणाचा दौरा केला होता आणि कोकणवासियांना मदतीचं आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे काहींना मदत मिळाली तर काही जण अजुनही प्रतिक्षेत आहेत.

Cyclone Damage | कर्दे गावातील वादळग्रस्तांना मदत मिळणार, नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्या-अनिल परब