Maharashtra Politics: राज्यासाठी रविवार (2 जुलै) हा राजकीय महानाट्याचा दिवस ठरला आणि राज्याला नवे नऊ मंत्री मिळाले आहेत. पण आता प्रश्न असा उपस्थित केला जातो की सध्याच्या मंत्रिमंडळाची (Cabinet) नेमकी स्थिती काय आहे आणि मंत्रिमंडळात अजून किती जागा शिल्लक आहेत. रविवारी अजित पवारांनी (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यांच्यासोबत आणखी आठ मंत्र्यांनी मंत्रीपदाची देखील शपथ घेतली. त्यामुळे राज्याला नवे मंत्री मिळाले खरे पण यानंतर राज्यातील मंत्रिमंडळाची समिकरणं कशी असणार आहे अनेक प्रश्न जनतेच्या मनात सध्या उपस्थित केले जात आहेत.
मागील काही दिवसांपासून शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल या चर्चांनी चांगलाचा जोर धरला होता. त्यामुळे वर्षभरापासून रखडलेला विस्तार लवकरच होईल आणि आपली मंत्रीपदी वर्णी लागेल अशी अपेक्षा भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांना होती. रविवारी शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार झाला खरा पण कुणी विचारही केला नसेल असा धक्कादायक भूकंप राज्याच्या राजकारणात घडला. त्यानंतर अजित पवारांनी उरलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार देखील लवकरच होईल असंही सांगून टाकलं.
राज्यातील मंत्रीमंडळाची सध्याची स्थिती काय?
सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या आमदारांची संख्या ही 288 इतकी आहे. पण मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची संख्या ही विधानसभा सदस्यांच्या 15 टक्के पेक्षा जास्त असता कामा नये असे नियमात सांगण्यात आले आहे. त्यामुळे या नियमांनुसार राज्यात जास्तीत जास्त 43 मंत्री होऊ शकतात. यामध्ये किती कॅबिनेट मंत्री आणि किती राज्यमंत्री करायचे हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. राज्यात सध्या कॅबिनेट मंत्र्यांची संख्या ही 29 आहे. या 29 कॅबिनेट मंत्र्यांच्या मंत्रिमंडळात शिंदे गटाचे 10, भाजपचे 10 आणि आता राष्ट्रवादीचे नऊ मंत्री आहेत. आता राज्य मंत्रीमंडळाची नियुक्ती लवकरच केली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.
आता शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारने 29 कॅबिनेट मंत्री तर निवडले आहेत. पण आता राज्य मंत्र्यांची निवड आता या सरकारमध्ये कधी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच आता उरलेल्या आमदारांना राज्य मंडळ तरी मिळेल का याची देखील उत्सुकता सर्वांना लागली आहे. आता पुढच्या मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार की त्यासाठी देखील अजून वाट पाहावी लागणार असा प्रश्न देखील आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता या राजकीय नाट्याच्या पुढच्या अंकाची वाट अवघा महाराष्ट्र पाहत असल्याचं चित्र सध्या आहे.