12 सप्टेंबर 2018 रोजी राज्य वीज आयोगाने राज्यातील वीज वितरण कंपन्यांच्या नव्या वीजदरांना मान्यता दिली होती. त्यामुळे अदानी, टाटा पॉवर आणि महावितरण या कंपन्यांचे वीजदर वाढले होते. राज्य वीज आयोगाने महावितरणला 8 हजार 268 कोटी रुपयांची दरवाढ करण्यास मंजुरी दिली होती. आता 1 एप्रिल 2019 पासून नव्या आर्थिक वर्षभरात ग्राहकांना नव्या दरवाढीचा फटका बसणार आहे.
दर महिन्याला 100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांकडून महावितरणकडून 5.30 रुपये प्रति युनिट दर आकारला जात होता. परंतु आता लागू करण्यात येणाऱ्या नव्या वीजदरांनुसार त्यामध्ये 16 पैशांची वाढ होऊन प्रति युनिट 5.46 रुपये मोजावे लागणार आहेत.
जे ग्राहक दरमहा 101 ते 300 युनिटपर्यंत वीजेचा वापर करतात, त्यांच्याकडून प्रति युनिट 24 पैसे अधिक आकारले जाणार आहेत. तर 300 ते 500 युनिट वीजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांकडून प्रति युनिट 15 पैसै अधिक आकारले जातील. वीजदरांसह स्थिर आकारातही 10 रुपयांची वाढ केली जाणार आहे.